शाहिद आफ्रिदीचे बीसीसीआयवर आरोपांची राळ
क्रीडा आणि राजकारण यांची एकत्र सरमिसळ करण्याचा प्रयत्न करतात
दिल्ली : यंदा पाकिस्तानकडे चँपियन्स ट्रॉफीचे यजमानपद आहे, पण भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास बीसीसीआयने नकार दिल्याने हा मुद्दा भलताच चर्चेत आहे. याच निर्णयानंतर या स्पर्धेचा व्हेन्यू आणि वेळ यावरून बरेच वाद सुरू आहेत. हा वाद निकालात काढण्यासाठी, त्यावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीने मोठे पाऊल उचललं आहे. त्यासाठी आज, अर्थात 29 नोव्हेंबर रोजी एक मीटिंग ठेवण्यात आली आहे . या मीटिंगमध्ये दोन्ही बोर्डांच्या अधिकाऱ्यांदरम्यान सध्या सुरू असलेल्या वादावर चर्चा होणार असून तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. मात्र या मीटिंगपूर्वीच पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी भडकला असून त्याने बीसीसीआयवर आरोपांची राळ उडवली आहे.
शाहिद आफ्रिदीचे आरोप काय ?
शाहिद आफ्रिदीने बीसीसीआयवर आपला राग काढला असून भारतीय बोर्ड क्रीडा आणि राजकारण यांची एकत्र सरमिसळ करण्याचा प्रय्तन करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट चिंताजनक स्थितीत आहे. आफ्रिदीने हायब्रीड मॉडेलविरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचे समर्थन केले. ‘हायब्रीड मॉडेलबाबत पीसीबीच्या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे’ असे तो म्हणाला. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेची समस्या असूनही पाकिस्तान क्रिकेट संघाने 5 वेळा भारताला भेट दिली, असं त्याचं म्हणणं आहे. आपली शक्ती वापरून सर्वांना समान वागणूक द्यावी अशी मागणी त्याने आयसीसी आणि बोर्डाच्या संचालकां समोर केली आहे.
मीटिंगपूर्वी PCBचं म्हणणं काय ?
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताविना चँपियन्स ट्रॉफी खेळवण्यास पीसीबी ( पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) तयार आहे. पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, आपण हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नसल्याचे पीसीबीने आयसीसीसमोर मीटिंगपूर्वीच स्पष्ट केलं आहे. चँपियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी दुसरा पर्याय शोधण्यात यावा, असा सल्लाही दिली आहे. याशिवाय भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये खेळण्याची परवानगी नसल्याची लेखी मागणीही त्यांनी केली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, जर सरकार आपल्याला दुसऱ्या देशात खेळण्याची अनुमति देत नाही, असे एखाद्या संघाचे म्हणणे असेल तर त्यासंदर्भत त्या संघाला बोर्डाला तशी लेखी सूचना द्यावी लागते. मात्र भारतीय संघाकडून अद्याप अशी सूचना मिळाली नसल्याचे सूत्रांनी नमूद केलं.
या 3 मुद्यांवर होणार चर्चा
चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याबाबत आयसीसीच्या बैठकीत तीन पर्यायांवर विचार केला जाऊ शकतो. पहिला पर्याय हायब्रिड मॉडेल आहे, ज्या अंतर्गत टीम इंडिया वगळता सर्व संघांचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. तर दुसऱ्या पर्यायानुसार, ही पूर्ण स्पर्धा पाकिस्तानबाहेर खेळवण्यात यावी, मात्र असे झाले तरी स्पर्धेच्या यजमानपदाचे सर्व अधिकार PCBकडेच राहतील. तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे संपूर्ण स्पर्धाच पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येईल, पण भारतीय संघ त्यात सहभागी होणार नाही. या बैठकीत काय तोडगा निघतो, काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.