कोलकाता नाइटराइडर्स पराभूत, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुणतालिकेत अव्वल स्थानी
मुंबई – बंगळुरुच्या विराटसेनेनं कोलकाता नाइटराइडर्सला पराभूत करत स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह विराटसेना आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरुने २०५ धावांचा डोंगर रचला. ही धावसंख्या करताना कोलकात्याचे फलंदाज झटपट बाद झाले. कोलकात्याने ८ गडी गमवून १६६ धावा केल्या.
कोलकात्याचा डाव
बंगळुरुने कोलकात्यासमोर २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच कोलकात्याच्या फलंदाजांवर दडपण होतं. आघाडीचे फलंदाज आक्रमक फलंदाजी करताना झटपट बाद झाले. फलंदाजीसाठी आघाडीला आलेला शुबमन गिल ९ चेंडूत २१ धावा, राहुल त्रिपाठी २० चेंडूत २५ धावा, नितीश राणा ११ चेंडूत १८ धावा, तर दिनेश कार्तिक केवळ २ धावा करुन तंबूत परतला. शुबमनने आक्रमक खेळी करत २ चौकार आणि २ षटकार मारले. मात्र जेमिसनच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. कर्णधार ईऑन मॉर्गनही २३ चेंडूत २९ धावा करुन तंबूत परतला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर फटका मारताना थेट कोहलीच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसेलनं आक्रमक फलंदाजी करत संघाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र तोही संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याने २० चेंडूत ३१ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. मात्र हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला आणि संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या.
बंगळुरुचा डाव
ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरुनं कोलकात्यासमोर विजयासाठी २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. मॅक्सवेलनं ४८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या. तर एबी डिव्हिलियर्सनं ३४ चेंडूत ७६ धावांची नाबाद खेळी केली. त्यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. बंगळुरुला सुरुवातीला दोन धक्के बसले. कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटिदार झटपट बाद झाले. विराट ५ धावांवर खेळत असताना वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने ६ चेंडून ५ धावा केल्या त्यात एका चौकाराचा समावेश आहे. तर रजत पाटिदार वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने २ चेंडू खेळत केवळ एक धाव केली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडिक्कल जोडीनं बंगळुरुचा डाव सावरला. मात्र देवदत्त पडिक्कल २५ धावा करुन तंबूत परतला. प्रसिध्द क्रिष्णाच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल जोडीनं संघाच्या धावसंख्येत भर घातली. मॅक्सवेल पॅट कमिन्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात हरभजन सिंगच्या हाती झेल देऊन बाद झाला. तिथपर्यंत बंगळुरुने सन्मानजनक धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२१ या स्पर्धेतील बंगळुरु विरुद्ध कोलकाता दहावा सामना चेन्नईच्या एमए चिदम्बरम मैदानात झाला. नाणेफेकीचा कौल जिंकत विराटच्या बंगळुरु संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि विजयासाठी २०५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
दोन्ही संघातील खेळाडू
बंगळुरू: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, काईल जेमिसन, यजुर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज, रजत पाटीदार
कोलकाता: ईऑन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंग, प्रसिध कृष्णा