IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/kkr-vs-rcb.jpg)
शारजा – विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का दिला. एबी डिव्हिलियर्सचे झंझावाती अर्धशतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरुने कोलकाताच्या 82 धावांनी धुव्वा उडवला. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 112 धावाच करता आल्या. कोलकाताच्या 8 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे बंगळुरुने कोलकातावर 82 धावांनी सर्वात मोठा विजय साकारला.
कोलकाताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर आंद्रे रसेल आणि राहुल त्रिपाठी या दोघांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. बंगळुरुच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. बंगळुरुकडून ख्रिस मोरीस आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि इसरु उडाणा या चौघांनी प्रत्येकी 1 विकेट घेत मॉरिस आणि वॉशिंग्टनला चांगली साथ दिली.
त्याआधी बंगळुरुने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुची शानदार सुरुवात झाली. ऍरॉन फिंच-देवदत्त पडिक्कल या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 67 धावा जोडल्या. बंगळुरुला देवदत्त पडिक्कलच्या रुपात पहिला झटका लागला. देवदत्तने 32 धावांची खेळी केली. यानंतर 94 धावांवर बंगळुरुला दुसरा झटका लागला. ऍरॉन फिंच 47 धावांवर बाद झाला. यानंतर एबीडी मैदानात आला. एबीडीने विराटच्या सोबतीने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी तडाखेदार फलंदाजी केली. या दरम्यान एबीडीने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर एबीने आणखी आक्रमक फलंदाजी केली. विराटने वेळोवेळी एबीडीला फटकेबाजी करण्यासाठी संधी दिली. एबी आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 100 धावांची भागीदारी केली. बंगळुरुकडून एबी डीव्हिलियर्सने नाबाद 73 धावांची शानदार खेळी केली. यात 6 षटकार आणि 5 चौक्यांचा समावेश होता. तर विराटने नाबाद 33 धावांची खेळी करत एबीडीला चांगली साथ दिली. तसेच कोलकाताकडून प्रसिद्ध क्रिष्णा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.