IPL 2020 : पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Maxwell-Pooran-KXIP-IPL_.jpg)
दुबई – काल रंगलेल्या आयपीएल सामन्यात निकोलस पुरनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा जोरदार पराभव केला. दिल्लीने पंजाबला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान पंजाबने 5 विकेट्स गमावून 1 षटकाआधीच पूर्ण केले. पंजाबने एकूण 167 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीचा गब्बर शिखर धवनची शतकी खेळी व्यर्थ ठरली.
सामन्याच्या सुरुवातीला दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 षटकांत 5 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने सलग दुसऱ्यांदा जब्बर शतकी खेळी केली. धवनने 57 चेंडूत धमाकेदार शतक केले. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 106 धावा केल्या. या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. धवनचं हे यंदाच्या मोसमातलं सलग दुसरं शतक ठरलं. याआधीच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही त्याने नाबाद 101 धावांची खेळी केली होती. तसेच कालच्या सामन्यात दिल्लीकडून धवनव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ 7 धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने प्रत्येकी 14 धावा केल्या. मार्कस स्टोयनिसने 9, तर शिमरॉन हेटमायरने 10 धावांची खेळी केली. त्याचबरोबर पंजाबकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ग्लेन मॅक्सवेल, जेम्स निशाम आणि मुर्गन आश्विन या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तसेच पंजाबकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने महत्त्वपूर्ण 32 धावा केल्या. तसेच युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलनेही झटपट 29 धावांची छोटेखानी पण उपयुक्त खेळी केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. रवीचंद्रन आश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.