‘आयपीएल’पूर्वी नागरी कामे पूर्ण करण्याच्या सूचना; प्रशासन, पोलीस आयुक्तालयाचे निर्देश
![Instructions for completion of civil works before IPL; Administration, Directions of Commissionerate of Police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/ipl-trophy.jpg)
नवी मुंबई | आयपीएल क्रिकेट सामन्याचा यंदाचा मोसम २६ मार्चपासून सुरू होत असून नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियममध्ये २० सामने होणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई पालिका प्रशासन व पोलीस आयुक्तालयाने नागरी कामे व प्रकल्पांची कामे २५ मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे. या काळात नवी मुंबईत ७० हजार क्रिकेट रसिक येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
करोनाची तिसरी लाट ओसरल्याने पूर्ण क्षमतेने सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत. यात २६ मार्चपासून आयपीएल क्रिकेट सामने मुंबई, पुणे येथे होत असून नवी मुंबईतही २० सामने होणार आहेत. त्यामुळे पोलीस व पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. मोठय़ा प्रमाणात येणारे प्रेक्षक आणि खेळाडू यांची काळजी घेण्याची जबाबदारी दोन्ही प्रशासनांवर येऊन ठेपली आहे. शहरात पालिकेने अनेक नागरी कामे काढलेली आहेत. यात मान्सूनपूर्व कामांचादेखील समावेश आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होणारी कामे २५ मार्चपूर्वी हातावेगळी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. उरण मार्गावरील उड्डाणपुलाचे काम २० मार्चपर्यंत करण्याच्या सूचना पोलीस वाहतूक विभागाने दिल्या आहेत.
खेळाडूंना वॉटर टॅक्सीचा पर्याय
नवी मुंबईत यापूर्वी क्रिकेट सामने झालेले आहेत. मात्र खेळाडूंना सामने झाल्यानंतर परत मुंबईत जाण्यास वाहतूक अडथळा मोठय़ा प्रमाणात निर्माण होत होता. त्यामुळे खेळाडू नवी मुंबईत खेळण्यास राजी होत नसत. सामना संपल्यानंतर हॉटेलवर परतण्यास २ ते ३ तास लागत होते. नवी मुंबई ते भाऊचा धक्का जलवाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे खेळाडू वॉटर टॅक्सीने मुंबईत जाऊ शकणार आहेत.