मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा पारा चढलेला
गौतम गंभीर इंग्लिश ग्राऊंड स्टाफसोबत कचाकच भांडला
मुंबई : भारतीय संघ पाचव्या कसोटीत विजय मिळवून इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडने चौथ्या कसोटीत विजयासाठी जोर लावला होता, परंतु शुभमन गिल, रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर मैदानावर उभे राहिले. या तिघांनी शतक झळकावताना इंग्लंडला ड्रॉवर समाधान मानण्यास भाग पाडले. या निकालाने भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे आणि ते दी ओव्हल येथे होणाऱ्या कसोटीसाठी कसून सराव करताना दिसत आहेत. पण, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचा आज पारा चढलेला दिसला.
भारतीय संघाने दुसरी कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली होती. पण, लॉर्ड्सवर विजयाच्या अगदी जवळ पोहोचून भारताच्या वाट्याला निराशा आली. २२ धावांनी ती मॅच भारताने गमावली आणि इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मँचेस्टर कसोटीत भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या आणि इंग्लंडने त्यांना ६६९ धावांनी प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या डावात शून्यावर दोन फलंदाज गमावल्यानंतर भारताने चांगले पुनरागमन केले.
हेही वाचा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान; अमित शाह यांची लोकसभेत माहिती
शुभमन गिल, जडेजा व सुंदर यांच्या शतकाच्या जोरावर भारताने चौथी कसोटी अनिर्णीत राखून स्पर्धेतील आव्हान कायम राखले. आता भारतीय संघ ओव्हल ग्राऊंडवर सराव करतोय, परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कुठल्यातरी गोष्टीवरुन नाराज दिसला. भारताला सरावासाठी दिलेल्या खेळपट्टीवरून गंभीर नाराज दिसला आणि त्याने तेथील ग्राऊंड स्टाफसोबत हुज्जत घातली. तो गंभीरला काहीतरी समजावताना दिसला. पण, या दोघांमधील वाद वाढतच गेला.
गौतम गंभीरने अखेर स्टाफला तिथून निघून जाण्याचा इशारा केला आणि नंतर दूर जाऊन बोट दाखवून काहीतरी बोलला. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील दुसऱ्या सदस्याने मधस्थी करून स्टाफला जाण्यास सांगितले.
भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग.





