MIT कॉलेजमध्ये “Smallest AI Hackathon 2025” अंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
शिक्षण विश्व: हॅकाथॉन स्पर्धांमध्ये प्रभावी सहभागासाठी विद्यार्थ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे | एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, आळंदी (डि.), पुणे येथील SCI TECH Club तर्फे “Smallest AI Hackathon 2025” या उपक्रमाच्या अनुषंगाने “हॅकाथॉन स्पर्धांमध्ये प्रभावी सहभागासाठी मार्गदर्शन” या विषयावर एक विशेष कार्यशाळा २५ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या विशेष सत्राचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजय माने (डीन – अॅनालिटिक्स व तांत्रिक उपक्रम समन्वयक, VIT पुणे) होते. त्यांनी विद्यार्थ्यांना हॅकाथॉनमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली तयारी, संघभावना, नवोन्मेष (Innovation), आणि प्रोटोटायपिंग या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. हॅकाथॉन म्हणजे केवळ कोडिंग नव्हे, तर समस्या समजून घेऊन नावीन्यपूर्ण उपाय सुचविण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेत एकूण १६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आगामी Smallest AI Hackathon 2025 स्पर्धेसाठी ६० टीम्स आणि एकूण ३०० विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.
या कार्यक्रमात कॉलेजचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सुनील महाजन (डीन – विद्यार्थी कल्याण), डॉ. शितल घोटेकर (SCI TECH Club समन्वयक), तसेच SCI TECH टीम यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना हॅकाथॉनसाठी अधिक सज्ज करण्यास उपयुक्त ठरली असून, नव्या कल्पनांना दिशा देणारा हा उपक्रम ठरल्याचे मत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.





