बाद झाल्यावर बॅटवर काढला राग अन् IPLने थेट खिसा केला रिकामा! ‘केकेआर’च्या रघुवंशीला दंड

Angkrish Raghuvanshi fine : लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीला मॅच फीच्या २०% दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट देखील जमा झाला आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात रघुवंशीला क्षेत्ररक्षणात अडथळा आणण्याच्या नियमांतर्गत बाद ठरविण्यात आले. पंचाच्या निर्णयावर नाराज झालेल्या रघुवंशीने रागाच्या भरात सीमारेषेवरील कुशनवर बॅट मारली आणि डगआऊटमध्ये आपले हेल्मेट जोरात फेकून दिले होते.
आयपीएलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू अंगक्रिश रघुवंशी याने लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या ३८ व्या सामन्यात आचारसंहितेच्या ‘लेव्हल १’ मधील नियमांचे उल्लंघन केले आहे. यासाठी त्याला मॅच फीच्या २०% दंड आणि एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे.”
हेही वाचा – फक्त मल्टिव्हिटॅमिन्स गोळ्यांमुळे तुमचे आयुष्य निरोगी होईल का?
रघुवंशीने आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केले आहे. ‘क्रिकेटचे साहित्य, मैदानावरील उपकरणे किंवा फिक्स्चरचा गैरवापर’ करण्याशी या प्रकार संबंधित आहे. ५ व्या षटकात बाद झाल्यानंतर त्याने दाखवलेल्या आक्रमक वर्तणुकीमुळे ही कारवाई करण्यात आली. रघुवंशीने आपली चूक मान्य केली असून ही शिक्षा स्वीकारली असल्याचेही आयपीएलने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
रविवारी (२६) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना अत्यंत थरारक झाला. केकेआरची सुरुवात खराब झाली होती, मात्र रिंकू सिंगने नाबाद ८३ धावांची खेळी करत संघाला सावरले. शेवटच्या चेंडूवर षटकार मारून लखनौने सामना टाय केला होता. दोन्ही संघांनी १५५ धावा केल्यामुळे सामना ‘सुपर ओव्हर’ मध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये केकेआरने बाजी मारली आणि रिंकू सिंगला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.





