आरुष पावसकरचा मुलांच्या एकेरी गटात मेन ड्रॉमध्ये रोमांचक विजय
आंध्र प्रदेशच्या खेळाडूला हरवले

मुंबई : गोव्याच्या आरुष पावसकरने पेडेम येथील मल्टीपर्पज स्टेडियम येथे झालेल्या योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सब-ज्युनियर (अंडर-15 आणि अंडर-17 ) रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा 2025 च्या मेन ड्रॉच्या पहिल्या दिवशी शानदार कामगिरी केली. 17 वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटाच्या 64 व्या फेरीत आरुषने आंध्र प्रदेशच्या मानकू टाकूविरुद्ध 21-14, 9-21, 21-19 असा रोमांचक सामना जिंकला. या विजयासह पुढील फेरीत जाणारा गोव्यातील एकमेव खेळाडू ठरला, कारण उर्वरित स्थानिक खेळाडू बाहेर पडले आहे.
गोव्यातील स्थानिक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, मात्र ते पहिल्या फेरीचा अडथळा पार करू शकले नाहीत. मुलांच्या एकेरी 17 वर्षांखालील गटात अद्वैत बालकृष्णनला राजस्थानच्या यश सोनीकडून 15-21 , 10-21 असा पराभव पत्करावा लागला. तर मुलींच्या एकेरी 17 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या केतकी थिटे आणि छत्तीसगडच्या रिधिमा सैनी यांनी अनुक्रमे यशिला रिथिका चेल्लुरी आणि शिवांजली थिटे यांचा पराभव केला. त्यामुळे या दोघीही स्पर्धेतून बाहेर पडल्या.
मुलांच्या दुहेरी 15 वर्षांखालील गटात शान चेरकला कुंजुट्टी आणि मोहम्मद उमर शेख या जोडीला महाराष्ट्राच्या विहान कोल्हाडे आणि हृदान पडवे यांच्याकडून 12-21 , 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला, तर स्पर्श कोलवलकर आणि अर्णव सराफ या जोडीला 18-21, 21-12, 20-22 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरी 15 वर्षांखालील गटात अर्णव सराफ आणि निहारिका परवार या जोडीला कर्नाटकच्या एडवर्ड एड्रियन आणि सुप्रीता दीपक यांच्याकडून 18-21 , 21-19 , 16-21 असा पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा – ‘मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं तर..’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर
मुलींच्या 15 वर्षांखालील दुहेरीत गोव्याच्या डिंपल रेवणकर आणि तिची तेलंगणाची जोडीदार तनिष्का गंजी यांना आंध्र प्रदेशच्या विजय तेजस्विनी दंतुलुरी आणि हरियाणाच्या जोएल राणा यांच्याकडून 12-21, 17-21 असा पराभव पत्करावा लागला.
मुलांच्या 15 वर्षांखालील एकेरीमध्ये अव्वल मानांकित कर्नाटकच्या पुष्कर साईने दिल्लीच्या अविश मेहताला 21-19, 21-5 असे हरवले. तर तिसऱ्या मानांकित पंजाबच्या वजीर सिंगने उत्तराखंडच्या यथार्थ किरोलाला 21-19, 21-12 असे हरवले. मुलींच्या 15 वर्षांखालील एकेरीमध्ये अव्वल मानांकित शायना मनिमुथूने स्मृती एस.चा 21-8, 21-13 असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित तेलंगणाच्या अवनी विक्रम गोविंदने गुजरातच्या अन्वी पटेलचा 17-21, 22-20, 21-13 असा पराभव केला.
17 वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात, महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित देव रूपारेलिया आणि तेलंगणाच्या तिसऱ्या मानांकित अखिल रेड्डी बोब्बा यांनी आरामात पुढच्या फेरीत प्रवेश केला. आता सामने अधिक रंजक होत असल्याने गोव्याच्या चाहत्यांना आरुष पावसकरकडून मोठ्या आशा असणार आहेत.