हिमा दासला पाचवे सुवर्णपदक!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Untitled-4-34.jpg)
भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच असून शनिवारी तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५२.०९ सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले.
गेल्या १५ दिवसांत २०० मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने ४०० मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. व्ही. के. विस्मया हिने ५२.४८ सेकंद अशी कामगिरी करत रौप्यपद पटकावले. सरिताबेन गायकवाड हिने ५३.४८ सेकंदासह कांस्यपदक तर एम. आर. पूवाम्मा हिने ५३.७४ सेकंदासह चौथा क्रमांक प्राप्त केला.
पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या नोह निर्मल टॉम याने ४६.०५ सेकंदासह रौप्यपदक पटकावले. कझाकस्तानच्या माझेन अल-यासिन याने ४५.९८ सेकंद अशी कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या २०० मीटर शर्यतीत मोहम्मद अनास याने २०.९५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले.