मुंबई इंडिअन्सला धक्का, मलिंगा संघातून बाहेर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/malinga.jpg)
मुंबई – आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्याआधीच अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता मुंबई इंडियन्स चा खेळाडू लसिथ मलिंगा स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटीन्सनचा संघात बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. लसिथ मलिंगा याने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाला सांगितले. त्यामुळे तो श्रीलंकेत आपल्या कुटुंबासोबतच राहणार आहे. त्यामुळे जेम्स पॅटीन्सनला संघात समाविष्ट करण्यात आलं असून आठवड्याच्या अखेरीस तो अबु धाबीतील मुंबई संघाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे संघ व्यवस्थापनाच्या पत्रकात सांगण्यात आले.
मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी जेम्स पॅटीन्सन याचे संघात स्वागत केले. तसेच, मलिंगाला हवी ती मदत करण्याचे आश्वासनही दिले. जेम्स हा सध्याच्या परिस्थितीत मुंबईच्या संघासाठी उपयुक्त वेगवान गोलंदाज ठरू शकतो, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. लसिथ मलिंगा हा मुंबई संघाचे बलस्थान होते. लसिथ मलिंगाची अनुपस्थिती आम्हाला नक्कीच जाणवेल यात वाद नाही. पण मलिंगाची अडचणदेखील आम्ही समजू शकतो, असे अनिल अंबानी म्हणाले.
मुंबई संघाचा मलिंगा हा IPLच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १२२ सामन्यांमध्ये १७० बळी घेतले आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या अमित मिश्रापेक्षा तो २३ बळींनी पुढे आहे. मलिंगाने ६ वेळा डावात चार बळी टिपले आहेत. तर एकदा डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी टिपले आहेत. २०११च्या IPLमध्ये त्याने १३ धावांत ५ बळींची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. २०१९च्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला पायचीत करणाऱ्या मलिंगाने त्या गेल्या हंगामात १६ बळी टिपले होते.