Breaking-newsक्रिडा

भारताच्या अजय जयरामची उपान्त्य फेरीत धडक

  • वर्ल्ड टूर सुपर बॅडमिंटन स्पर्धा 

फुलर्टन – दुखापतीतून सावरलेला भारताचा गुणवान बॅडमिंटनपटू अजय जयराम याने कोरियाच्या हेओ क्‍वांग ही याचे आव्हान 21-18, 21-12 असे सरळ गेममध्ये मोडून काडताना येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टूर सुपर बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली.

वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनामुळे दीर्घकाळ बॅडमिंटनपासून दूर राहिलेल्या अजय जयरामला आजच्या उपान्त्यपूर्व लढतीत हेओ क्‍वांग ही याने पहिल्या गेममध्ये जबरदस्त लढत दिली. मात्र त्यातून सावरलेल्या अजय जयरामने पुढची गेम सहज जिंकून 50 मिनिटे रंगलेल्या या लढतीत रोमांचकारी विजयाची नोंद केली. आता अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी अजय जयरामसमोर फ्रान्सच्या मार्क कॅलिजोव याचे आव्हान आहे.

तुफान फॉर्ममध्ये असलेल्या अजय जयरामला गेल्या वर्षी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर त्याला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावे लागले. त्यामुळे त्याची विश्‍वक्रमवारीत 13 व्या क्रमांकावरून थेट 134व्या स्थानावर घसरगुंडी झाली आहे. मात्र पुनरागमनानंतर तो विश्‍वक्रमवारीत प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

त्याआधी अजय जयरामने ब्राझिलच्या यिगोर कोएल्होचा तीन गेमच्या कडव्या झुंजीनंतर 19-21, 21-12, 21-16 असा संघर्षपूर्ण पराभव करताना उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. अजय जयरामने कोएल्डोविरुद्ध पहिली गेम गमावली होती. मात्र त्याने दुसऱ्या गेमपासून हुशारीने आपल्या खेळाच्या शैलीत बदल केला. शटल फटकावताना वेगात अचानक बदल करून त्याने कोएल्होला गोंधळात टाकले. दुसरी गेम गमावल्यावर कोएल्होने तिसऱ्या गेममध्ये 14-14 अशी बरोबरी साधली. परंतु अजयने पुन्हा एकदा कल्पक खेळ करीत सलग चार गुण जिंकले आणि अखेर बाजी मारली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button