बांगलादेशला विजय आवश्यक आज अफगाणिस्तानशी सामना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Untitled-12-28.jpg)
विश्वचषक क्रिकेट स्पध्रेची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राखण्यासाठी जिगरबाज बांगलादेशला सोमवारी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. मात्र भारताला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झगडायला लावणाऱ्या अफगाणिस्तानला कमी लेखणे बांगलादेशला महागात पडू शकेल.
इंग्लंडचा शुक्रवारी श्रीलंकेने पराभव केल्यामुळे आता विश्वचषकामधील रंगत वाढली आहे. उपांत्य फेरीच्या स्थानासाठी बांगलादेशसुद्धा शर्यतीत आहे. मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशने आतापर्यंतच्या सहा सामन्यांत पाच गुण मिळवून गुणतालिकेत सहावे स्थान राखले आहे. बांगलादेशने वेस्ट इंडिजचे ३२२ धावांचे लक्ष्य ४१.३ षटकांत आरामात पेलले. मग ऑस्ट्रेलियाच्या ३९२ धावांच्या लक्ष्याचा आत्मविश्वासाने पाठलाग करताना ८ बाद ३३३ धावा केल्या. शाकिब अल हसन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरून सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय घडवत आहे. अफगाणिस्तानचा संघ विश्वचषकामधील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मात्र भारताविरुद्धच्या कामगिरीने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल.