फिरकी खेळण्यासाठी शास्त्रींचा धोनीला ‘गुरुमंत्र’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/shastri-dhoni.jpg)
यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी फिरकी गोलंदाजी आत्मविश्वासाने खेळताना दिसलेला नाही. धोनीला फिरकी गोलंदाजी खेळताना अडचणी जाणवल्या आहेत. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी धोनीने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबरोबर चर्चा केली.
व्यवस्थापन कौशल्यात माहीर असलेले रवी शास्त्री उपयुक्त फिरकी गोलंदाजी सुद्धा करायचे. भारताचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी कसोटीमध्ये १५१ आणि वनडेमध्ये १२१ विकेट काढल्या आहेत. नेटमध्ये सराव केल्यानंतर धोनीने शास्त्रींबरोबर फिरकी गोलंदाजी कशी खेळायची त्यावर चर्चा केली.
शास्त्री आपल्या हाताचे मनगट वळवून फिरकीला कसे सामोरे जायचे त्याबद्दल धोनीला मार्गदर्शन करत होते. धोनी सुद्धा त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकत होता. जवळपास २० मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर धोनी खेळपट्टीच्या दिशेने गेला तर शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये गेले. मधल्या षटकात फिरकी गोलंदाजी सुरु झाल्यानंतर धोनीचा खेळ अडखळत असल्याकडे सचिनने लक्ष वेधले होते.
धोनी संघातील वरिष्ठ खेळाडू असून सध्या त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली असली तरी अनेकांच्या मनात धोनीच्या फलंदाजीबद्दल शंका आहे. खरंतर धोनीने या वर्ल्डकपमध्ये खूप खराब खेळ केलेला नाही. पण धोनी आता पूर्वीसारखी फलंदाजी करत नाही. संघाला गरज असताना वेगाने धावा बनवण्याबरोबर मोठे फटके खेळत नाही असे टीकाकारांचे म्हणणे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयासाठी मोठे फटके खेळण्याची गरज असताना धोनीने आपल्या खेळाची गती वाढवली नाही म्हणून त्याच्यावर टीका झाली होती. दुसऱ्या बाजूला भारतीय संघ व्यवस्थापन धोनी संघाच्या गरजेनुसार खेळ करतो असे सांगून त्याचा बचाव करत आहे.