फिफा विश्वचषक : अचूक अंदाज वर्तवणाऱ्या डुकराने उपान्त्य फेरीसाठी निवडले 4 संघ

- अचिलीस मांजरानंतर डुक्कर वर्तवत आहे विश्वचषकाचे भविष्य
मॉस्को – यापूर्वी 2010 मधील फिफा विश्वचषक स्पर्धेत पॉल ऑक्टोपस प्रत्येक सामन्यापूर्वी अन्न ठेवलेल्या दोन पेटयांपैकी एकाची निवड करून सामन्यात कोणता संघ विजयी होणार याची भविष्यवाणी करायचा. त्याचप्रमाणे रशियातील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी यंदा ऍचिलस नावाची पांढरी मांजर सर्व संघांचे भवितव्य ठरवणार आहे. तसेच त्याच्या जोडीला एक डुक्करही समोर आले आहे.
प्रत्येक सामन्यापूर्वी ऍचिलससमोर दोन खाद्यपदार्थाची भांडी ठेवून सामना खेळणाऱ्या देशांचे झेंडे त्यामागे ठेवण्यात येणार आहेत. ऍचिलस ज्या देशासमोर ठेवलेल्या भांडयातील खाद्यपदार्थ फस्त करेल तो संघ विजयी ठरेल असे सांगण्यात येत होते, त्यात आणखीन एका एका भविष्य जाणणाऱ्या डुकराची भर पडली आहे. त्यामुळे लोकप्रियतेचा कळस गाठणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या दंतकथांमध्ये आणखी एकीची भर पडणार आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धा नुकतीच सुरु झाली असून या स्पर्धेतील बारा सामने आतापर्यंत झाले आहेत. या सामन्यांत यजमान रशिया, उरुग्वे, इराण यांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. तर पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यातील सामना बरोबरीत सुटला आहे. ब्राझिलला बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे, तर गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का बसला आहे. साखळी फेरीतील अजून बरेचसे सामने शिल्लक असल्याने विश्वचषक कोण जिंकेल, हे आता सांगणे जवळपास अशक्य आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक गटातून कोणते दोन संघ स्पर्धेत पुढे जातील, हे देखील सांगणे कठीण आहे.
मात्र एका भविष्य जाणणाऱ्या डुकराने आताच विश्वचषक 2018 मधील उपान्त्य फेरीतील चार संघ सांगून टाकले आहेत. विशेष म्हणजे या डुकराने 2014 साली झालेल्या विश्वचषक स्पिर्धेचा विजेता जर्मनी होईल, हे भविष्यदेखील आधीच सांगितले होते. मिस्टिक मार्कस असे या डुकराचे नाव असून ते डुक्कर आठ वर्षांचे आहे. या डुकराने रशिया येथे होत असलेल्या विश्वचषकामध्ये कोणते 4 संघ उपान्त्य फेरीचा पल्ला गाठतील याचे भविष्य वर्तवले आहे.
मार्कसच्या पुढ्यात 32 फळे ठेवण्यात आली होती. त्या फळांवर विश्वचषक 2018मध्ये सहभागी झालेल्या 32 देशांचे झेंडे लावण्यात आले होते. त्यापैकी मार्कसने 4 फळे निवडून उपान्त्य फेरीत जाणारे संघ सांगितले. मार्कसने अर्जेंटिना, उरुग्वे, बेल्जियम आणि नायजेरिया हे चार झेंडे असलेली फळे निवडली. त्यामुळे हे चार संघ उपान्त्य फेरीत पोहोचतील, अशा मार्कसने व्यक्त केलेल्य अंदाजावर सट्टेबाजी सुरूही झाली आहे.




