धोनी, शिखर धवन यांचा सराव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/dhoni-.jpg)
- कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेच्या तयारीत भारतीय संघ
सिडनी- लाल चेंडूंच्या प्रकारात ऑस्ट्रेलिया संघावर मात केल्यावर आता भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य ठेऊन सरावात घाम गाळत आहे. भारतीय एकदिवसीय संघात निवड झालेले सर्व खेळाडू सिडनी येथे पोहचले असून महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, केदार जाधव, अंबाती रायुडू यांनी सरावही केला आहे. पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जवळ असल्याने एकदिवसीय सामन्याना जास्त महत्त्व आले आहे.
भारतीय कसोटी संघातील खेळाडू मालिका विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असताना नुकतेच ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झालेले खेळाडू तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सराव करत आहेत. शिखर धवन आणि केदार जाधव यांनी फलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षणाचा जास्त सराव केला तर मागील काही मर्यादीत षटकांच्या मालिकेत धाव बनवण्यात अपयशी ठरलेल्या महेंद्रासिंग धोनीने फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासह जाळीत सराव केला. आशिया चषक आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या घरच्या मालिकेत महेंद्रासिंग धोनीला छाप पाडता आलेली नाही. विश्वचषकापूर्वी संघातील आपले स्थान मजबूत करण्यासाठी धोनीकडे फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिका आहेत. विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी महेंद्रसिंग धोनीच्या अनुभवाचे महत्त्व लक्षात घेता त्याला या दोन मालिकांमध्ये स्वतःला सिद्ध करावे लागेल. त्यासाठी तो फलंदाजीवर लक्ष केंद्रित करीत आहे.
तसेच, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलॅंडचे माजी गोलंदाज जलदगती गोलंदाज ड्रिक नॅनेस यांनी जसप्रीत बुमराला कसोटी सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रंती देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ते पुढे म्हणाले, तुमच्याकडे कौशल्य आणि प्रगल्भता असेल तर तुम्ही मर्यादीत षटकांच्या प्रकारातून कसोटी प्रकारात येत असला तर तुम्ही जुळवून घेऊ शकता. परंतू, येथे तुम्हाला कौशल्यांचा वापर योग्यवेळी करता आला पहिले आणि चेंडूला एकाच जागेवर वारंवार टाकण्याचे कला आत्मसात करायला हावी. बुमराहच्या यशामध्ये त्याची शारीरिक तंदुरुस्तीही एक मोठे कारण आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
भारतीय संघाने योग्य रणनीती वापरावी यासाठी ते म्हणाले, भारतीय संघाकडे सर्वात चांगला गोलंदाजी विभाग आहे. परंतु, एक डावखुरा जलदगती गोलंदाज भरतीय संघाला मिळाला तर गोलंदाजी विभागाची ताकद आणखी वाढेल. त्याच्याकडे चेंडू स्विंग करणारे गोलंदाज आहेत. तर उच्च दर्जाचे फिरकी गोलदाजही आहेत. भारतीय संघाने योग्य रणनीतीने एकदिवसीय मालिकेत उतरायला हवे. कारण, एकदिवसीय सामन्यांची खेळपट्टया या सपाट असून तेथे फिरकी गोलंदाजांना फारशी मदत मिळण्याची शक्यता नाही. तर हार्दीक पंड्याला ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा अनुभव नाही, असेही नॅनेस म्हणाले.