कोहली-विजयच्या भागीदारीने भारताची कडवी झुंज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/kohli-vijay-.jpg)
- भारत-इसेक्स तीन दिवसीय सराव सामना
चेम्सफोर्ड: कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर मुरली विजय यांची झुंजार अर्धशतके आणि त्यांनी केलेल्या संघर्षपूर्ण भागीदारीनंतरही इसेक्सविरुद्ध तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाची बलाढ्य फलंदाजी अपेक्षित कामगिरी करू शकली नाही.
अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या दुसऱ्या सत्रात 5 बाद 160 धावा झाल्या होत्या. या वेळी लोकेश राहुल नाबाद 7 धावांवर खेळत असून दिनेश कार्तिक नाबाद 7 धावांवर त्याला साथ देत होता. इंग्लंडविरुद्ध आव्हानात्मक अशा कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला सरावासाठी मिळालेला हा एकमेव सामना आहे. परंतु हिरव्यागार खेळपट्टीवर भारताच्या वरच्या फळीची दाणादाण उडाल्यामुळे मूळ समस्या कायम असल्याचेच दिसून आले.
वेगवान गोलंदाज मॅट कोल्सने पहिल्या आणि तिसऱ्या षटकांत अनुक्रमे शिखर (0) धवन आणि चेतेश्वर पुजारा (1) यांना परतवीत भारताला हादरे दिले. अजिंक्य रहाणेने मुरली विजयच्या साथीत 39 धावांची भर घातली. परंतु दुसरा वेगवान गोलंदाज मॅथ्यू क्विनने अजिंक्य रहाणेला (17) बाद करीत भारताची 3 बाद 44 अशी अवस्था केली.
अखेर विराट कोहली आणि मुरली विजय यांनी चौथ्या गड्यासाठी 22.2 षटकांत 90 धावांची शानदार भागीदारी करून ही घसरगुंडी रोखली. परंतु डावकुरा वेगवान गोलंदाज पॉल वॉल्टरने मुरली विजय व विराट कोहली यांना बाद करीत भारताची 5 बाद 147 अशी अवस्था केली. मुरली विजयने 113 चेंडूंत 7 चौकारांसह 53 धावा केल्या. तर विराट कोहलीने 93 चेंडूंत 12 चौकारांसह 68 धावांची आक्रमक खेळी केली.
भारत विरुद्ध इसेक्स हा सराव सामना मूळ चार दिवसांचा होता. परंतु आता हा सामना केवळ तीन दिवसांचाच होणार आहे. खेळपट्टी व मैदानाची स्थिती पाहून भारतीय संघव्यवस्थापनाने सराव सामना न खेळण्याचाच पवित्रा घेतला होता. अखेर अनेक घडामोडींनंतर हा सामना खेळण्यास भारताने मान्यता दिली. दरम्यान इंग्लंडमध्ये सध्या उष्णतेची लाट असून किमान तापमानही 29 अंशांच्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळेच पहिल्या कसोटीपूर्वी खेळाडूंना दमणूक होऊ नये व त्यांना पुरेशी विश्रांती मिळावी, याच हेतून हा सामना तीन दिवसांचा करण्याची विनंती आपण केल्याचे भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले.