इटालियन लीग सिरी एच्या खेळाडूंना सरावाची परवानगी; २७ मेपासून सामने सुरू हाेण्याचे चित्र

रोम. कोरोनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन जगातील टाॅप-५ फुटबाॅल लीगच्या सामने आयाेजनाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे सर्वच खेळाडू अडचणीत सापडलेले आहेत. अशा लाॅकडाऊनच्या काळात आता इटलीचे पंतप्रधान गिऊसिपी काेंटे यांनी खेळाडूंना आणि तमाम फुटबाॅलप्रेमींना दिलासा देणारा माेठा निर्णय घेतला. यामुळे आता इटालियन सिरी ए लीगचे खेळाडू लवकरच मैदानावर खेळताना दिसणार आहेत.
इटालियन सिरी ए लीगच्या खेळाडूंना आता येत्या ४ मेपासून सराव करण्यास परवानगी देण्यात आली. लाॅकडाऊनच्या काळात या लीगला सूट देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी साेमवारी जाहीर केला. त्यामुळे आता येत्या ४ मेपासून या लीगचे खेळाडू वैयक्तिक ट्रेनिंगला सुरुवात करू शकतील. त्यानंतर १८ मेपासून सांघिक सरावाला सुरुवात करण्याची परवानगी देण्यात आली.
याच सकारात्मक निर्णयामुळे आता यंदाच्या या लीगला येत्या २७ मेपासून सुरुवात हाेण्याचे चित्र निर्माण झाले. सध्या या लीगच्या १२ व्या फेरीतील सामनेही अद्याप झालेले नाहीत. राेनाल्डोचा युवेंट्स संघ सर्वाधिक गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.





