TOP Newsताज्या घडामोडीपुणे

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत भरतीय जनता पक्षाशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल या दोन पॅनेलनंतर आता आणखी एका पॅनेलची भर पडली आहे. छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलने पदवीधर गटाच्या निवडणुकीत सहा उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीचे पॅनेल जाहीर झालेले असताना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयूआय) छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला पाठिंबा दिला असून, विद्यापीठ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र आहे.

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलच्या स्थापनेबाबत शशिकांत तिकोटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अधिसभा निवडणुकीतील पदवीधर गटातून सुनील दळवी, वाहीद कासम शेख, शशिकांत तिकोटे, देवराम चपटे, अमोल खाडे, मयूर भुजबळ निवडणूक लढवणार आहेत. पॅनेलच्या भूमिकेविषयी शशिकांत तिकोटे म्हणाले, की छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्ताने बहुजन समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण होण्यासाठी त्यांच्या नावाने पॅनेल स्थापन केले. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ यांच्या हिताची पॅनेलची भूमिका आहे.

काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीतर्फे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलची घोषणा करून पदवीधर निवडणुकीसाठी दहा उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात सहा राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर चार शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आहेत. त्यात काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने वेगळी भूमिका घेतली. एनएसयूआयचे शहराध्यक्ष भूषण रानभरे यांच्या स्वाक्षरीचे पाठिंबा पत्र छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला देण्यात आले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार एनएसयूआयने छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला पाठिंबा दिला असल्याचे एनएसयूआयचे कोथरूड अध्यक्ष राज जाधव यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी परस्पर त्यांच्या पॅनेलची घोषणा केली. काँग्रेसच्या एका उमेदवाराला घेण्याची मागणीही मान्य झाली नाही. त्यामुळे काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला पाठिंबा दिला, असल्याची माहिती काँग्रेस प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button