breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीलेख

विशेष लेख : अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात : कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये !

युवकाचा अपघात होतो.. शस्त्रक्रिया करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले गेल्याने पोटच्या गोळ्याला पुन्हा उभे करण्यासाठी आईची धडपड सुरू होते. परंतु, आपल्या जखमी मुलाला ओरबडण्यास “वायसीएम”ची श्वापद सज्ज असल्याचे पाहून ती माऊली पुरती हादरून जाते.

  • रोहित आठवले, पत्रकार, पिंपरी-चिंचवड.

 

डॉक्टरांनी सांगितलेली सामुग्री ठराविक कंपनी (ठेकेदार) कडून खरेदी केली नसल्याने तुमच्या मुलाची शस्त्रक्रिया अयशस्वी होईल अशी भीती दाखवून वस्तूरुपी (इंप्लांट) खंडणी उकळली जाते. मात्र, जुनी प्रकरण उकरून गुन्हे दाखल करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना या घटनेची महिन्यानंतर साधी कल्पना सुद्धा नाही.

शहरात गेल्या महिन्याभरात हा सगळा घटनाक्रम घडला आहे. परंतु, आपल्या मुलाबाळांना निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून धडपडणाऱ्या स्थानिक धेंडांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास वेळ झालेला नाही.

तर दुसरीकडे दर शुक्रवारी पुण्यात जाऊन दादांच्या पाया पडणाऱ्या आणि कोथरूडला जाऊन जिल्ह्याच्या नव्या दादांना आम्ही तुमचेच असल्याचे भासविण्यात व्यस्त असलेल्या शहरातील तथाकथित नगरसेवकांना हेच का आमचे भाई व ताई असा सवाल ती माऊली विचारू पाहत आहे.

अपघातानंतरचा रचला गेलेला “घात” त्या माऊलीच्या शब्दात पुढील प्रमाणे.. मी मूळची पिंपरी चिंचवड मधील रहिवासी. माझ्या समोरच हे महापालिकेचे वायसीएम हॉस्पिटल उभे राहिले. आजही या हॉस्पिटलमध्ये उत्तम आरोग्य सेवा मिळते ही माझी धारणा आहे. मागील महिन्यात माझ्या मुलाचा अपघात झाला.

काही लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पाय मोडल्याने त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल असे तेव्हा आम्हाला सांगितले गेले. मुलाची अवस्था पाहून आवश्यक ते सगळे करा. त्याला पुन्हा त्याच्या पायावर उभे करा हे आम्ही सांगत होतो. तेव्हा तेथील डॉक्टरांनी तुमचे रेशनकार्ड कोणत्या रंगाचे (आर्थिक घटक) असे विचारले. शस्त्रक्रिया कोणत्या आरोग्य सहाय्य योजनेत बसते हे सांगतानाच काही साधने बाहेरून विकत घ्यावी लागतील असेही सांगण्यात आले.

त्यांनी लिहून दिलेले रॉड व प्लेट (इंप्लांट) ची किंमत माझ्या दृष्टीने खूप होती. त्यामुळे ते कमी किमतीत कुठे उपलब्ध होतील हे शोधण्यात मला दोन दिवस गेले. ३५ हजार रुपयांपासून सुरू झालेली ही बोली शेवटी एका मेडिकल मध्ये १८ हजार आणि मी माझे गळ्यातील डाग तुमच्याकडे ठेवते म्हणाल्यावर १४ हजारांवर येऊन थांबली. माझ्या आधाराला त्याच्या पायावर पुन्हा उभे करण्यासाठी मी धडपडत होते.

पैशांची जुळवाजुळव करून आवश्यक असल्याचे सांगितले गेलेली प्लेट व रॉड (इंप्लांट) खरेदी करण्यासाठीची आगाऊ रक्कम भरून त्याची पावती (बुकिंग) मी डॉक्टरांकडे घेऊन गेली. मात्र, त्यानंतर काही वेळाने तुमचा मुलगा त्याचा पायावर उभा राहिलेला पाहायचा नाही का? तुम्हाला मुलाची काळजी नाही का? आम्हाला एवढंच काम आहे का? अनेक लोकांची शस्त्रक्रिया वेटिंगवर असताना आम्ही तुम्हाला वेळ देत आहोत असे खूप काही मला ऐकवले गेले.

मला नेमके काय घडले तेच समजेना. मी म्हणाले, तुम्ही सांगितलेले मी घेऊन तर आली आहे. एक दिवस उशीर झाला आहे. पण पैसे उभे करण्यात वेळ गेला असे सांगितल्यावर तुम्हाला पैसे दिसतात, मात्र मुलगा उभा राहिलेला पाहायचा नाही असेच आम्हाला आता दिसायला लागले आहे; असे म्हणून ते लोक तेव्हा निघून गेले. या गोंधळात मला काय घडतं आहे हे लक्षातच येत नव्हते. तिशीतला मुलगा विव्हळत पडलेला पाहून मला आंधारून येत होते.

तेव्हा एक माझ्याच मुलाच्या वयाचा मुलगा तेथे येऊन मला भेटला. तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या दुकानातून हे सगळे घेऊन या. मी लगेच त्यांना शस्त्रक्रिया करायला सांगतो असे तो म्हणाला. पण त्या दुकानदाराने मला अधिकचे पैसे सांगितले असून, तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत असे मी त्याला सांगितले. त्यावर तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी मला थेट जे सांगितले ते भयंकर आणि तेवढंच भीतीदायक होते ते म्हणजे, ठराविक कंपनीचे इंप्लांट तुम्ही आणून दिले नाही तर तुमच्या मुलाची शस्त्रक्रिया अयशस्वी होईल. मुलाला उभे करायचे आहे की नाही? असा सवाल ही सर्वांसमक्ष मला दरडवला गेला.

नाईलाजाने मी १४ हजारात मिळणारे इंप्लांट खरेदी करण्यासाठी दिलेली आगाऊ रक्कम विनवण्या करून परत घेऊन आले. त्यानंतर अजुन ११ हजार रुपये देऊन शस्त्रक्रिया सुरू करण्यास विनवण्या केल्या. मात्र, उर्वरित ५ हजार रुपये देऊन पूर्ण पैसे मिळाले अशी पावती घेऊन येण्यास मला भाग पाडण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रिया पूर्ण झाली. मुलाला आठ दिवसांनी घरी सोडण्यात आले. पण आपण लहानाचे मोठे झालेल्या आणि आपल्या डोळ्या देखत उभ्या राहिलेल्या हॉस्पिटलमध्ये आपली झालेली लूट माझ्या जिव्हारी लागली आहे.

गळ्यातील डाग (दागिना) परत बनेल सुध्दा. पण गळ्यातील डागापेक्षा माझा मुलगा उभा राहणे मला जास्त महत्वाचे वाटल्याने मी तेव्हा काही बोलले नाही. घडलेला सर्व प्रकार मला आमच्या भागातील भाई आणि ताईंच्या कानावर घालायचा होता पण ते भेटलेच नाहीत. शहरात दोन आयुक्त आहेत म्हणे.. त्यांना पण घडलेला सगळा प्रकार मी स्वतः जाऊन सांगायला तयार आहे परंतु, करोनाचे कारण पुढे करून मला त्यांच्या पर्यंत जाऊन दिले गेले नाही. मी तक्रार करून काही होईल की नाही मला माहीत नाही. पण सगळ्यांच्या गळ्यात डाग नसतो आणि कोणाचाही आधार असा अंथरुणाला खिळून राहू नये एवढंच माझे म्हणणे आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button