breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“काहींना इतकी मळमळ आहे, की ते म्हणतात…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला; मुंबई पालिकेसाठी दिला नारा!

मुंबई |

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं आहे. चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. गोव्यात तीन अपक्षांच्या मदतीने भाजपा सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. या विजयानंतर मुंबईत आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुंबई महानगर पालिका निवडणुकांचं बिगुल वाजवलं आहे. “खरी लढाई तर मुंबईत होणार आहे.

मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजपा असा कलगीतुरा रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. गोव्यामध्ये ४० जागांपैकी २० जागांवर भाजपाचे उमेदवार जिंकून आले आहेत. तर काँग्रेसला फक्त ११ जागांवर विजय मिळवता आला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेली १ जागा अपक्षांच्या मदतीने पूर्ण करून भाजपा सत्तास्थापनेसाठी दावा करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

  • “विजयामध्ये महाराष्ट्राच्या सेनेचा मोठा हात”

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी गोव्यातील विजयामध्ये महाराष्ट्रातील सेनेचा मोठा वाटा असल्याचं विधान केलं. मात्र, लागलीच त्यावरून शिवसेनेवर खोचक टोला देखील लगावला. “महाराष्ट्रातल्या आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचे मी आभार मानेन. हा विजय मिळवण्यामध्ये महाराष्ट्राच्या सेनेचा फार मोठा हात आहे. सेना म्हणजे भाजपाची सेना. दुसऱ्या सेनेचं तिथे काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल. ते त्या ठिकाणी येऊन गर्जना करत होते की आम्ही भाजपाला हरवू. त्यांची लढाई भाजपाशी नसून नोटाशी होती.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज नोटापेक्षाही कमी आहे”, असं फडणवीस म्हणाले. “मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी गर्जना केली होती की आम्ही प्रमोद सावंतांना हरवणार. शिवसेनेचे सगळे नेते तिकडे गेले. शिवसेनेच्या उमेदवाराला तिथे ९७मतं मिळाली. त्यामुळे हा कौल भाजपाचा आहे, मोदींचा आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

  • काहींची मळमळ, काहींची कळकळ!

“सगळ्यांनाच आनंद झालाय असं नाहीये. काही लोकांना इतकी मळमळ आहे, की ते म्हणतात अपरिचित देवदूतापेक्षा परिचित दैत्य बरा. इतकी मळमळ काही बरी नाही. तुम्ही कितीही मळमळ केली, तरी मोदीच निवडून येणार आहेत”, असं फडणवीस म्हणाले.

  • “खरी लढाई मुंबईत होईल”

“लढाई अजून संपलेली नाही. खरी लढाई मुंबईत होईल. मुंबईला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाही, तर आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीत. मुंबई महानगर पालिकेला भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत दम घेता येणार नाही. मुंबईचा प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपाचं पूर्ण बहुमताचं सरकार तयार करण्यासाठी आपण सज्ज राहावं”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button