TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

करोनाकाळात वाढलेली ३५ टक्के औषध दुकाने बंद; गेल्या वर्षांत पाच हजार परवाने परत

मुंबई : करोनाकाळात औषधांना असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन राज्यात ठिकठिकाणी नवी औषध दुकाने उभी राहिली. मात्र, करोना ओसरू लागल्यानंतर मागणी कमी झाल्याचा फटका या औषध दुकानांना बसू लागला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत सरासरी ३५ टक्के औषध दुकाने बंद झाली आहेत.

राज्यात एकूण ९८ हजार ८३६ औषध दुकाने असून, करोनाच्या गेल्या तीन वर्षांत एकूण ४१ हजार ४५५ नवे औषध परवाने देण्यात आले होते. मात्र, यापैकी १२ हजार ६७२ परवाने दुकान मालकांनी प्रशासनाला परत केले आहेत. औषध दुकानांचा विशेषत: ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक परिसरात सुळसुळाट झाला होता. त्यामुळे व्यवसायाला फटका बसणे साहजिक होते. व्यवसाय मंदावल्याचे पाहून अनेकांनी परवाने परत केले पसंत केले असावे, असे मत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गौरीशंकर बायले यांनी व्यक्त केले. 

करोनापूर्व काळात म्हणजे २०१९-२० मध्ये दहा हजार ३४४ नवे परवाने दिले गेले होते तर त्यापैकी चार हजार २९० परवाने परत करण्यात आले होते. याचा अर्थ औषध दुकानांच्या व्यवसायात मंदी आली होती किंवा औषध दुकानांचा सुळसुळाट झाला असावा, याकडेही सहआयुक्त गौरीशंकर यांनी लक्ष वेधले. मात्र, करोना टाळेबंदीत औषधे वगळता अन्य दुकानांना बंदी असल्यामुळे अनेकांनी औषध व्यवसायाकडे मोर्चा वळवला. त्यामुळे औषध दुकानांसाठी २०२० मध्ये म्हणजे करोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात तब्बल १३ हजार ४४१ नवे परवाने मागण्यात आले. २०२१ मध्ये करोनाची दुसरी लाट आल्यानंतर दुकानांच्या संख्येत आणखी वाढ होऊन तो आकडा १७ हजार ९१८ इतका झाला. आता करोना ओसरल्यानंतर गेल्या सात महिन्यात नव्या औषध दुकानांसाठी फक्त नऊ हजार ७५२ परवाने दिले गेले आहेत. त्याचवेळी औषध दुकानांचे परवाने परत करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. २०२०-२१ मध्ये ३९२२ तर २०२१-२२ मध्ये ५००७ परवाने परत करण्यात आले आहेत. गेल्या सात महिन्यांत तीन हजार ७४३ औषध दुकानांचे परवाने परत करण्यात आले आहेत.

घाऊक औषधविक्रीचे परवानेही परत..

  • औषध दुकानांप्रमाणेच औषधांची घाऊक विक्री करणाऱ्यांच्या परवान्यातही वाढ झाली होती. मात्र, गेल्या वर्षभरात हे परवानेही परत करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहेत. गेल्या तीन वर्षांत नऊ हजार ८४३ व्यापाऱ्यांना घाऊक औषधविक्रीचे परवाने दिले गेले. त्यापैकी चार हजार ७५ परवाने परत करण्यात आले आहेत.
  • करोनाची दुसरी लाट आली त्या काळात म्हणजे २०२१ मध्ये नवे औषध परवाने घेण्यात पुणे-कोल्हापूर (४७८९), औरंगाबाद (३४१४), नाशिक (३०७७), ठाणे (२५३६) आघाडीवर होते. मुंबईत फक्त ११५६ नवे परवाने दिले गेले. मात्र परवाने परत करण्यातही हीच शहरे पुढे होती. सर्वाधिक परवाने पुणे विभागातून परत करण्यात आले तर त्याखालोखाल औरंगाबाद, नाशिक आणि ठाणे यांचा क्रमांक लागतो. 

करोनापूर्व काळातही औषध दुकानांचा सुळसुळाट झाल्याने परवाने परत करण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, करोनाच्या शिरकावानंतर हे प्रमाण घसरले आणि नव्या परवान्यांची मागणी वाढली. करोना ओसरल्यानंतर पुन्हा आता परवाने परत करण्याची चढाओढ सुरू आहे.

– अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button