breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“बीआरटी मार्गावरून जाण्याची खासगी गाड्यांना परवानगी द्यावी”; सिद्धार्थ शिरोळे

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधीमंडळात मागणी

पुणे : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील बीआरटी मार्गावरून खाजगी गाड्यांना जाण्याची परवानगी देण्याची मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी चर्चेत बोलताना केली.
पुणे शहराच्या बीआरटी बाबत ही लक्षवेधी सूचना आमदार सुनील टिंगरे यांनी मांडली होती. या लक्षवेधी चर्चेमध्ये आमदार शिरोळे यांनी सहभाग घेतला. प्रशासन जर बीआरटी बंद करत नसेल तर ज्या खासगी बसगाड्या व अन्य गाड्या पुण्यातून रांजणगाव, हिंजवडी तसेच उपनगरांमधून राष्ट्रीय महामार्गावर जातात अशा खासगी गाड्यांचे मालक-चालक शुल्क भरायला तयार असून त्यांना शुल्क आकारून बीआरटी मार्गांवरून जाण्यास परवानगी द्यावी, असे आमदार शिरोळे म्हणाले.
सध्या पीएमपीएमएलची बस दर ५ मिनिटाला एक याप्रमाणे बीआरटी मार्गावरून धावत नाही. तसेच दोन बसगाड्यांच्या वेळेमध्ये अंतर सुद्धा जास्त असते. हे लक्षात घेऊन संगमवाडी बीआरटी मार्ग, हडपसर बीआरटी मार्ग, कात्रज बीआरटी मार्ग या मार्गांवर जर खासगी गाड्यांना परवानगी दिली तर पुणे शहराचा बराचसा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. यावर मंत्री महोदयांनी विचार करावा, अशी मागणी चर्चेच्या दरम्यान शिरोळे यांनी केली.
यावर उत्तर देताना शिरोळे यांची सूचना विचारात घेऊन सबंधित अधिकारी व तज्ज्ञांशी चर्चा करून बीआरटी मार्गांवरून खासगी गाड्या जाऊ शकतात का? आणि याचा त्रास जर नागरिकांना होणार नसेल तर, योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित समितीला देऊ, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button