TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दप्तर विसर्जन आंदोलन स्थगित; दरेवाडीची शाळा सुरु ठेवण्याबाबत मोठा निर्णय..

नाशिक – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि विस्थापित असणाऱ्या दरेवाडी या गावातील ४३ विद्यार्थ्यांची शाळा त्यांनी जिल्हा परिषदेवर धडक दिल्यानंतर पुन्हा सुरु झाली असली तरी ती कायमस्वरुपी सुरू राहील किंवा नाही, या वादावर शुक्रवारी पडदा पडला. इगतपुरी तहसील कार्यालयात गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत शाळा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरेवाडी या गावातील ग्रामस्थांची जागा भाम धरणात गेली. विस्थापितांसाठी त्या भागात शाळा सुरू करण्यात आली. मात्र काही महिन्यांपासून शाळा समायोजनचा मुद्दा चर्चेत आल्याने शाळा बंद राहिली. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराखाली नाशिक जिल्हा परिषदेवर धडक दिली. दप्तर घ्या आणि बकऱ्या द्या, अशी प्रशासनाला साद घालत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. या आंदोलनानंतर बुधवारी शाळा नियमितपणे आहे त्या जागेवर भरली. परंतु, शिक्षणाधिकारी भास्कर कनोजिया यांनी शाळा समायोजनसंदर्भात वेगवेगळी विधाने केल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी भाम धरण परिसरात दप्तर विसर्जित करण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर , शुक्रवारी सकाळी पोलिसांनी दरेवाडी येथील विस्थापितांची वस्ती गाठत पालकांशी चर्चा केली. पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत दप्तर विसर्जनाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. अखेर ती विद्यार्थी आणि पालकांनी मान्य केली. परंतु, शाळा सुरू करण्याविषयी संभ्रम असल्याने दुपारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, पोलीस अधिकारी यांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते, पालक यांची बैठक घेत भामनगर येथे सुरू असलेली शाळा नेहमीप्रमाणे सुरु राहील, असे आश्वासन दिले. यामुळे या वादावर पडदा पडला असून शाळा नियमित सुरू राहणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button