सावरकरांबाबत ‘त्या’ वादावर शिवानी वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाल्या,..
संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे
मुंबई : प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांबाबत एक विधान केलं होतं. सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा, असं त्या म्हणाल्या. त्याच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात आता दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान, या वादावर आता शिवानी वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार मी माझे विचार मांडू शकते. मी सावकरांबाबत जे काही बोलले ते चुकीचं आहे, असं मला वाटत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, मी माझे विचार मांडले.
काँग्रेस पक्ष नेहमीच सत्याच्या बाजुने उभा राहिला आहे. माझ्या व्हिडीओनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांचा मला पाठिंबा मिळणं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एक उर्जा मिळते, असं शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या.