breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्मार्ट सिटी’त भाजपचा ११० कोटींचा घोटाळा, आमदार प्रसाद लाड यांची ‘ईडी’मार्फत चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

पिंपरी | प्रतिनिधी

भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीतील विविध कामांमध्ये ११० कोटींचा घोटाळा केला आहे. या कंपनीने आर्थिक लूटमार केली असून आमदार लाड यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शिवसेनेने केली आहे.

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी आकुर्डीतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीबरोबर क्रिस्टल इंटिग्रेटेड पंपनीने ठेकेदार, उपठेकेदार म्हणून महत्त्वाचे व्यवहार केले आहेत. क्रिस्टल पंपनीमध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असे चारजण संचालक मंडळावर आहेत. या कंपनीने स्मार्ट सिटीचे काम टेक महिंद्रा कंपनीकडून जॉइंट व्हेंचरमध्ये घेतले. सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी ठेके मिळविले आहेत.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीने ३५० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. ही निविदा ५२० कोटी रुपयांना बहाल करण्यात आली. या निविदेत गडबड घोटाळा आहे. पाणी मीटर खरेदीतच पाणी मुरत आहे. खुल्या बाजारात १० ते १५ हजार रुपयांत मिळणारे एक पाणीमीटर १ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. या पाणीमीटरच्या व्यवहारातच सुमारे ७२ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पैशांची अफरातफर आहे. सर्वच रूमला लागणारे एकाच कंपनीचे व मॉडेलचे फायरवॉलचे एकाच कंपनीचे दर वेगवेगळे आहेत.

डिझेल जनरेटर इंस्टॉलेशन करण्याचा दर महिंद्रा कंपनीने २ कोटी ५७ लाख ९१ हजार इतका दिला आहे, तर महिंद्राच्या एमआरपीमध्ये सरकारच्या पोर्टलवर त्यांचा दर २१ लाख २६ हजार ६५५ रुपये इतका आहे. त्यात २ कोटी २० लाख रुपये जास्त दिसून येतात. काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे २५ ते ३० कोटी रुपये दंड लावणे अपेक्षित असताना केवळ काही लाखांचा दंड दाखवण्यात आला आहे. कोरोना सुरू होण्याच्या आधी मुदत संपलेली असताना कोरोनाचे कारण सांगून सरकारी निर्णयाचा गैरफायदा घेऊन स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाकडून सल्लागाराने अत्यंत शिताफीने दंड वाचवला असल्याचेही त्या म्हणाल्या.

ऑनलाइन ‘वॉटर क्वॉलिटी अॅनालायसिस एसटीपी मॉनिटरिंग सिस्टीम’साठी लागणार्या कंपनीचे प्रॉडक्ट बसविण्याचा विषय संचालक मंडळापुढे आहे. यात दर्जेदार कंपनी वगळून साध्या कंपनीकडून हे साहित्य घेऊन १० कोटी लाटण्याचा डाव सुरू आहे. ५२० कोटींच्या कामात क्रिस्टल इंटिग्रेटेड पंपनीने ११० कोटी रुपये लाटल्याचा आरोप उबाळे यांनी केला. त्यामुळे या कंपनीची चौकशी व्हावी. नातलग संचालक पदावर असल्याने आमदार लाड यांची ईडी व कॅगमार्फत चौकशी व्हावी. त्यांचे आमदार पद रद्द व्हावे. अन्यथा आम्हाला न्यायासाठी आंदोलन करावे लागेल असा इशाराही उबाळे यांनी दिला. निवडून आलेल्या नगरसेवक किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारीत सहभाग घेतला, तर त्यांचे नगरसेवक पद रद्द होते. असा कायदा असताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे पदही रद्द होणार का, असा सवालही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button