ताज्या घडामोडीपुणे

मोसमी पाऊस, जैवविविधतेवर सागरी उष्णतेच्या लाटांचा परिणाम

पुणे | हिंदी महासागरातील सागरी उष्णतेच्या लाटांच्या प्रमाणात चौपट आणि बंगालच्या उपसागरात दोन ते तीन पट वाढ झाली आहे. या सागरी उष्णतेच्या लाटांमुळे मान्सून आणि सागरी जैवविविधतेवर परिणाम होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.भारतीय उष्णप्रदेशीय हवामान शास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) डॉ. रॉक्सी कॉल मॅथ्यू, जे. ए. सरण्य, पाणिनी दासगुप्ता, अजय अजय आनंद या शास्त्रज्ञांच्या गटाने सागरी उष्णतेच्या लाटांच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. या संदर्भातील ‘जेनेसिस अँड ट्रेंड्स इन मरिन हिटवेव्ह्ज ओव्हर द ट्रॉपिकल इंडियन ओशन अँड देअर इंटरअ‍ॅक्शन विथ द इंडियन समर मान्सून’ हा शोध निबंध ‘जर्नल ऑफ जिओग्राफिकल रीसर्च ओशन्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी १९८२ ते २०१८ या काळातील सागरी उष्णतेच्या लाटांचा अभ्यास केला. त्यासाठी शास्त्रज्ञांनी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानासाठी आंतरराष्ट्रीय विदा आणि मान्सूनसाठी हवामानशास्त्र विभागाचा विदा वापरला.

भारतीय समुद्रातील वाढणारे तापमान हे सागरी उष्णतेच्या लाटांचे प्रमाण आणि तीव्रता वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे आढळून आले. मान्सूनच्या काळातील सागरी उष्णतेच्या लाटांमध्ये प्रशांत महासागरातील एल निनो हा घटक महत्त्वाचा असतो.

एल निनोमधील बदल आणि समुद्रातील वाढणाऱ्या तापमानामुळे हिंदूी महासागरात जास्त तीव्रतेच्या उष्णतेच्या लाटा येत असल्याचे निदर्शनास आले. गेल्या दशकभराच्या काळात हिंदूी महासागरातील उष्णतेच्या लाटांची तीव्रता मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. समुद्रात उष्णतेची लाट आलेली असताना मोसमी पावसाचे वारे त्याकडे खेचले जातात. मोसमी पावसाच्या वाऱ्यांमध्ये बाष्प असते. या बाष्पामुळेच पाऊस पडतो. मात्र उष्णतेच्या लाटांकडे वारे खेचले जाऊन पावसाचे प्रमाण कमी होते. बंगालच्या उपसागरात उष्णतेची लाट आल्यावर दक्षिण भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होते,तर मध्य भारतात पावसाच्या प्रमाणात घट होत असल्याचे या अभ्यासातून निदर्शनास आले. हिंदूी महासागरातील उष्णतेच्या लाटांचे प्रमाण चौपट, तर बंगालच्या उपसागरातील उष्णतेच्या लाटांचे प्रमाण दोन ते तीन पटीने वाढले आहे. या लाटांची तीव्रताही वाढली आहे.

या लाटांमुळे समुद्रातील प्रवाळांसारख्या जैवविविधतेवरही परिणाम होतो, असे डॉ. रॉक्सी कॉल मॅथ्यू यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button