breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेमहाराष्ट्र

‘गरवारे’च्या मित्र मैत्रिणींचे “साठ” वणीचे स्नेहसंमेलन

पुणे । महाईन्यूज ।

गरवारे कॉमर्स कॉलेजमधून १९७७ मध्ये बी. कॉम. पदवी घेतलेल्या सुमारे ५० पेक्षा अधिक मित्र मैत्रिणींचे एका दिवसाचे स्नेहसंमेलन नुकतेच जंगली महाराज रोड जवळील “क्लार्क्स इन्” मध्ये अतिशय उत्साहात पार पडले. सर्वच जण “साठी” पलीकडले असले तरी कॉलेज जीवनातील, विशीतील तारुण्याचा जोश सर्वांच्या हालचालीत व चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. साठीतील या तरुणाईने एकच जल्लोष करून या स्नेहसंमेलनात अक्षरशः कल्ला केला…

या कार्यक्रमासाठी मुद्दामहून मुंबई, डोंबिवली, सावंतवाडी, पाचगणी अशा निरनिराळ्या ठिकाणाहून मित्र मैत्रिणी एकत्र जमले होते. काही जण तब्बल ४५ वर्षानंतर एकमेकांना भेटत होते. व्हॉट्स अप ग्रुप मुळे थोडी माहिती असली तरी प्रत्यक्ष भेटीचा आनंद अवर्णनीय असतो, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा सर्वानी घेतला. आयुष्यात काय कमावलं, काय गमावलं याचा आढावा झाला. सध्या कोण काय करतो यातून आश्चर्यकारक महिती पुढे आली. काहींनी निवृत्तीनंतर ज्योतिष, नवा व्यवसाय, गीता-अभ्यास, संगीत साधना, पत्रकारिता अशा नवनवीन विषयात उल्लेखनीय यश संपादिले आहे. काहींनी विदेश पर्यटन केले आहे, तर काहींनी देशांतर्गत अंदमान यात्रा, नर्मदा परिक्रमा, गिरनार पर्वत अशा वैविध्यपूर्ण सहली केल्या आहेत.

वंदना कुलकर्णी यांनी “अभिनव अंताक्षरी” चा कार्यक्रम घेतला. त्यात सर्व उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेतला. महाविद्यालयीन जीवनाचा पुनःप्रत्यय घेतला. समूहाचे एक प्रमुख, ज्योतिष भास्कर प्रसन्नकुमार भिडे यांची “ज्योतिष आणि दैनंदिन जीवन” अशा विषयावर उषा सोमण यांनी मुलाखत घेतली. अनेक नेहमी मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांवर प्रसन्नकुमार यांनी सोप्या शब्दात उत्तरे समजावून दिली.

कुंदा पानसे, वसुंधरा खांडेकर, श्रीरंग रानडे, दिलीप भिडे यांनी गाण्यांचे सादरीकरण केले तर कुमार पारखी, उषा सोमण, संजय पंडित, माधुरी मुळे यांनी कविता वाचन केले . इतरही सर्वानी आपापले अनुभव, प्रवास वर्णने सांगितली. सुनीता बागडे यांनीही एक खूप छान खेळ घेतला, ज्यात सर्व जण सहभागी झाले. सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य खुलले. दरम्यान, कुमार पारखी यांच्या ई-बुक चे उद्घाटन विनायक करमरकर यांच्या सहकार्याने झाल्याचे जाहीर करण्यात आले.

सुप्रसिद्ध संगीतकार हर्षित अभिराज हे सन्माननीय पाहुणे कलाकार होते. त्यांची प्रश्नोत्तर स्वरूपात मुलाखत घेतली गेली आणि हर्षित अभिराज यांनीही मन मोकळेपणाने सर्व उत्तरे दिली. त्यांचा स्वतःचा या क्षेत्रातला प्रवास व कडू गोड अनुभव या बद्दल सांगितले. काही गाणी म्हणून दाखविली. निरोप घेण्यापूर्वी सर्वाना फुल झाडांची रोपे मैत्रीची भेट म्हणून देण्यात आली. सर्वानीच आपल्या मैत्री प्रमाणेच त्यांची जोपासना करण्याचे ठरविले. पुढील वर्षी कॉलेज जीवनाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने असाच मोठा मेळावा करावा, असे सर्वानीच बोलून दाखवले. या सर्व कार्यक्रमाचे संयोजन प्रसन्न भिडे, अजित धर्मे, कुमार पारखी, संजीव शाळगावकर, मुकुंद खुस्तले, सुनीता देव, सुनीता बागडे व उषा सोमण यांनी केले होते. वर्षभरासाठी आनंददायी आठवणी घेऊन सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button