breaking-newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘सारथी’ दुर्लक्ष केल्यास ‘दणका’ : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा

‘सारथी’ दुर्लक्ष केल्यास ‘दणका’ : महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

नागरिकांना तक्रारी मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या सारथी हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या तक्रारींकडे महापालिकेचे काही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्या तक्रारींवर १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.
तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी नागरिकांसाठी सारथी हेल्पलाइन योजना सुरू केली होती. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या योजनेचे राज्यभरात कौतुक झाले. त्यांची बदली झाल्यानंतर ती योजना रडतखडत सुरू आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अचानक सारथीवरील तक्रारींचा आढावा घेतचार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दंड ठोठावला होता. त्यानंतर तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करून त्या निरस्त केल्या जात होत्या. मात्र, पुढे काही महिन्यांत ती कार्यवाही पुन्हा थंडावली. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या काळात सारथी हेल्पलाइन पूर्णपणे दुर्लक्षित केले गेले. तसेच महापालिकेतील सारथीचा कक्ष निगडी येथील कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर येथे हलविण्यात आला. त्यामुळे कक्षाचा मुख्यालयाशी संपर्क तुटला.

मात्र, नवे आयुक्त सिंह हे सारथीबाबत अधिक जागृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी त्यासंदर्भात आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना केल्या आहेत. सारथीच्या तक्रारी व त्यावर झालेल्या कार्यवाहीवर ते स्थायी समितीच्या पहिल्या व तिसऱ्या सभेत आढावा घेणार आहेत. काही विभागांच्या तक्रारी तब्बल ५० ते ५५ दिवसांपर्यंत प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. तर, काही तक्रारींवर कार्यवाही न करताच त्या क्लोज करण्यात आल्या आहेत. त्याबाबत त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

महिन्यातून दोन वेळा आढावा घेणार सारथीवरील तक्रार १५ दिवसांच्या कार्यवाही करून त्या निरस्त कराव्यात. तसे न केल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. तसेच, ते स्थायी समिती सभेत महिन्यातून दोन वेळा आढावा घेणार आहेत. त्यामुळे सर्वच विभागप्रमुख सतर्क झाले असून, तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

हेल्पलाइन सुटसुटीत करण्याचे प्रयत्न महापालिकेच्यासंदर्भात सारथीवर प्राप्त झालेल्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी तब्बल १३५ विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. ही संख्या मोठी असल्याने कार्यवाहीस नाहक अधिक वेळ वाया जात होता. विभागाची संख्या आता ५५ वर आणण्यात आली आहे. संबंधित तक्रार थेट विभागप्रमुखांकडे पाठविली जात आहे. त्यामुळे ते योग्य त्या अधिकाऱ्यांकडे संबंधित तक्रार पाठवून त्यावर कार्यवाहीच्या सूचना करू शकतील. त्यामुळे कार्यवाहीत जाणारा वेळ वाचणार आहे. तसेच, तक्रार करण्यासाठी दीड मिनिटाचा वेळ पाच मिनिटे करण्यात आला आहे. ही प्रणाली नागरिक व अधिकाऱ्यांच्या बाजूने अधिक सुटसुटीत करण्यासाठी नवनवीन कल्पनांची जोड देण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले. सारथी हेल्पलाइनचा क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. त्यावर नागरिक आठवड्यातील सात दिवस २४ तास तक्रार करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button