breaking-newsपिंपरी / चिंचवड

धर्मादाय व खासगी रुग्णालयांत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करा – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना महामारी असेपर्यंत पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरातील सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात यावी. तसे केल्यास एकही गोरगरीब नागरिक पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दोन्ही शहरातील कोरोनाबाधित नागरिकांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सचा तुटवडा भासत आहे. कोरोना महामारीने राज्यात शिरकाव केल्यानंतर सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करून सर्व खासगी रुग्णालयांना ८० टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले आहे. या कायद्याची सुरूवातीला अंमलबजावणी न करणाऱ्या खासगी रुग्णालयांनी आता गांभीर्य ओळखून अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकडून वसूल केल्या जाणाऱ्या उपचाराचा खर्च हा सर्वसामान्य व गरीब रुग्णांना पेलवणारा नाही. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या वाढत्या बिलासंदर्भातील तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

अशा स्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांना उपचार मिळाल्यास त्यांना फार मोठा दिलासा मिळेल. पुणे शहरातील नामवंत धर्मादाय रुग्णालय रूबी हॉल क्लिनिक, जहांगिर, इनलॅक्स एल बुधराणी, के. ई. एम. आणि पुना हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये २ जुलै २०२० पासून पुढील तीन महिन्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरातील सर्वच धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविल्यास सर्वसामान्य आणि गरीब कोरोना रुग्ण पैशाअभावी उपचारांपासून वंचित राहणार नाहीत. तसेच खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाढव्य बिलांसंदर्भातील तक्रारी देखील कमी होतील. त्यामुळे कोरोनाची महामारी असेपर्यंत पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरातील सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तातडीने लागू करण्याचे निर्देश संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.” 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button