breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : उपकाराची परतफेड की परोपकाराची भावना?

  • जगताप विरोधी गटातील अनेकांची सत्वपरीक्षा

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाची दिशा ठरवणारी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी होणार, असे प्रथमदर्शनी दिसत असले, तरी खऱ्या अर्थाने उपकाराची परतफेड की परोपकाराची भावना ? या मुद्यावरच चिंचवडकर न्याय निवाडा करणार आहेत. कारण, आजच्या घडीला जगताप घराण्याविरोधात जी मंडळी उभी ठाकली आहे. त्यामध्ये काहींचा अपवाद वगळता सर्वांना दिवंगत जगताप यांनी पडत्या काळात मदत केली आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे दि.३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. जगताप कुटुंबीय या दु:खातून अद्याप सावरलेले नाही. अल्पावधीतच अनपेक्षीतपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. सर्वपक्षीय शोकसभेत दिवंगत जगताप यांच्याबाबत भावूक होवून सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन घडवणारे, आठवडाभरात ‘’ना भिती…ना सहानुभूती… आता ठरली रणनीती..’’ अशा मानसिकतेत आले, याचे तमाम पिंपरी-चिंचवडकरांना आश्चर्य वाटू लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे यांनी पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा दावा केला. २०१७ मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, अपक्ष माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांच्यासह चिंचवड विधानसभेतील प्रभावी दावेदार आणि शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनीही तयारी केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘डिसिझन मेकर’ अजित पवार यांच्याकडे शहर राष्ट्रवादीत प्रस्ताव पारीत करुन पाठवण्यात आला. ही निवडणूक राष्ट्रवादीने कोणत्याही परिस्थितीत लढवावी आणि त्यासाठी पक्षातीच उमेदवाराला संधी द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. यावर अजित पवार यांनी पुण्यात जाहीरपणे सांगितले की, दोन दिवसांत आम्ही मुंबईत बैठक घेवू आणि निर्णय निश्चित करु. त्यामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीकडून इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
पंरतु, ही वेळ उपकाराची जाण ठेवण्याची आहे. परोपकारी वृत्तीचे दर्शन घडवून राजकीय संकुचितपणा सिद्ध करणे राष्ट्रवादीसह सर्व इच्छुकांना शोभणारे नाही किंवा हा राजकीय सुसंस्कृतपणा नाही, ही सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा आहे. त्याला आधारही तसाच आहे. चिंचवड मतदार संघातील मातब्बर नेते म्हणून ज्यांची आज ओळख आहे. अपवाद वगळता ही यापैकी सर्वांना जगताप घराण्याने संधी दिली. मानसन्मान दिला आहे.

नफरत की बाजार में प्यार का संदेश…
आजच्या घडीला जे नेते मंडळी जगताप घराण्याबाबत विरोधाची भूमिका घेत आहेत. त्यांच्यावर दिवंगत जगताप यांचे उपकार आहेत, हे मान्य करायला हवे. याला दुस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनीच दुजोरा दिला आहे. पोटनिवडणुकीच्या लढाईचा शंखनाद सुरू असताना, बनसोडे मात्र संवेदनशील भूमिका मांडताना दिसतात. ‘‘दिवंगत आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात सक्रीयपणे काम केले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर नाराज होवून त्यांची पक्ष सोडला नव्हता. त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. त्यामुळे भाजपाने जगताप घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास अवघ्या दीड वर्षांसाठी असलेली ही जागा बिनविरोध करावी.’’ अशी भूमिका आमदार बनसोडे यांनी स्पष्टपणे मांडली. ‘‘नफरत की बाजार में प्यार का संदेश’’ या उक्तीप्रमाणे आमदार बनसोडे यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे.

राजकीय उपकाराची परतफेड करण्याची ही वेळ…
राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडेंपासून अगदी राहुल कलाटे यांच्यापर्यंत प्रत्येकाच्या राजकीय जीवनातील सुरूवातीच्या काळात आमदार जगताप यांनी मदत केली आहे. राष्ट्रवादीत असताना जगताप आणि लांडे या दोन नेत्यांच्या हातात शहरातील सत्ता एकवटली होती. त्यावेळी जगताप यांनी अनेकांना नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, उपमहापौर, महापौर अशी मानाची पदे दिली आहेत. विशेष म्हणजे, २०१९ च्या निवडणुकीत कट्टर विरोधक असलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी दिवंगत जगताप मैदानात उतरले. याउलट, राहुल कलाटे यांनी दोनदा जगताप यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, कलाटे यांचा राजकीय प्रवास जगताप यांच्या साथीनेच झाला होता, हा खरा इतिहास आहे. मात्र, मोठी पदे मिळाल्यानंतर अनेकांची राजकीय महत्त्वाकांक्षाही वाढली आणि जगताप घराण्याविरोधात बंडाचे निशाण अनेकांनी हाती घेतले. मात्र, आज पूर्वी केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आहे, याचे भान संभाव्य दावेदारांनी ठेवले पाहिजे, अशी भावना जगताप घराण्याशी निष्ठा असलेल्यांकडून बोलून दाखवली जात आहे.

हंबरडा फोडून रडणारे सोबत राहणार की रंग बदलणार?
दिवंगत आमदार जगताप यांच्या निधनानंतर भाजपासह सर्वपक्षीय समर्थक ‘चंद्ररंग’ वर हंबरडा फोडून रडताना पिंपरी-चिंचवडकरांनी पाहिले आहेत. जगताप यांच्या अस्थी अजून थंडही झाल्या नाहीत, तोपर्यंत जगताप घराण्याला राजकाराणातून बाजूला करण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे. त्यासाठी ‘‘आता नाही, तर कधिच नाही’’ असा संदेश तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इच्छुकांनी जगताप विरोधी गटाची मोट बांधण्यासाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत. मात्र, जगताप यांच्या मृत्यू नंतर हंबरडा फोडणारे जगताप घराण्यासोबत राहणार की रंग बदलणार? याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष आहे. पोटनिवडणूक झालीच, तर अनेकांचा बुरखा फटणार असून, भाजपा आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचा हिशोब करणार, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

अजित गव्हाणे तुम्हीसुद्धा चुकलाच…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे ज्यांच्या मदतीने राजकारणात आले, त्यामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचे मोठे योगदान आहे. किंबहुना, लांडे यांच्या शिफारसीनुसारच गव्हाणे शहराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. गव्हाणे ज्यावेळी स्थायी समितीचे सभापती झाले, त्यावेळी शहर राष्ट्रवादीत ‘डिसिझन मेकर’ दोन नेते होते. त्यामध्ये लांडे आणि दिवंगत आमदार जगताप या दोघांच्या मदतीनेच अजित गव्हाणे स्थायीचे सभापती झाले, असे समकालीन नेते खासगीत सांगतात. दुसरीकडे, माजी आमदार विलास लांडे यांनी प्रस्तावित विधी महाविद्यालयाला दिवंगत जगताप यांचे नाव देण्याची घोषणा केली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष भाजपाचे मातब्बर नेते देवेंद्र फडणवीस यांचीही वाहवा मिळवली. किमान पोटनिवडणुकीत अजित गव्हाणे यांनी मनाचा मोठेपणा दाखवणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. गव्हाणे यांनी जाहीरपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली. प्रस्ताव तयार केला आणि पक्षश्रेष्ठी अर्थात अजित पवार यांना निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राष्ट्रवादीतील सुसंस्कृत नेता अशी ओळख असलेल्या अजित गव्हाणेंकडून ही अपेक्षा कदापि नव्हती, अशी खंत ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button