breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘‘केसाने गळा कापू नका…’’ शिंदे गटातील नेत्याचा भाजपाला इशारा!

रामदास कदम: महाराष्ट्रातील भाजपा जे काही करत आहे ते फारच घृणास्पद

मुंबई : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून ते देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपर्यंतच बैठकींचं सत्र सुरु असतानाही महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरुन रस्सीखेच आणि कुरघोडीचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. जागावाटपासंदर्भात समोर येत असलेल्या वेगवेगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांचा संयमही यादरम्यान सुटत चालल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानावरुन शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. रामदास कदम यांनी भारतीय जनता पार्टीला इशारा दिला आहे.

भाजपाने केसाने गळा कापू नये

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून आपल्या मुलाला मुद्दाम जाणीवपूर्वकपणे त्रास दिला जातोय असा आरोप रामदास कदमांनी केला आहे. रवींद्र चव्हाण हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. चव्हाणांच्या विषयावरुनच बोलताना रामदास कदमांनी भाजपा नेत्यांना थेट, ‘भाजपाने केसाने गळा कापू नये,’ असा इशारा दिला आहे. ‘माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा,’ असं सूचक विधान करत त्यांनी भाजपा नेत्यांना वरिष्ठांनी समज द्यावी असं म्हटलं आहे.

हेही वाचा – चिंचवडगावात भाजपाच्या जाहिरातीला काळे फासले!

भाजपाची वागणूक फारच घृणास्पद

“महाराष्ट्रातील भाजपा जे काही करत आहे ते फारच घृणास्पद आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे,” असं रामदास कदम म्हणालेत. पुढे बोलताना कदम यांनी, “प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. मात्र जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केलं तर भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांना असायला हवं. आपल्यातील संबंधांबाबत जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचं भान भाजपाच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे,” असं रामदास कदम म्हणाले.

भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही

“आमची (संयुक्त शिवसेना) आणि भाजपाची 2009 मध्ये युती होती तरीही भाजपाने मला गुहागरच्या विधानसभा निवडणुकीत पाडलं हे वास्तव आहे,” अशी आठवणही रामदास कदमांनी करुन दिली. “आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. स्थानिक आमदार असलेल्या योगेश कदम यांना बाजूला ठेवून त्यांच्याच मतदारसंघात विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं केली जात आहेत. स्थानिक आमदाराला त्रास देण्याचं काम हेतूपुरस्पर चाललं आहे. असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. या प्रकरणाची दखल भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर घेतली गेली पाहिजे, माझं प्रामाणिक मत आहे,” असं रामदास कदम म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button