breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

राजस्थानने हातातोंडाशी आलेला विजय गमावला; दिल्लीच्या आशा जिवंत!

दिल्ली 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला तर राजस्थान दुसऱया स्थानावर

महाईन्यूज । स्पोर्ट्स डेस्क : राजस्थानने हातातोंडाशी आलेला विजय गमावला आणि दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा आणखी पल्लवित झाल्या. दिल्लीच्या 222 धावांचा संजू सॅमसनच्या झंझावातामुळे राजस्थानने जबरदस्त पाठलाग केला होता. पण 27 चेंडूंत 60 धावांची गरज असताना संजू बाद झाला आणि दिल्लीने सामन्याला कलाटणी दिली. दिल्लीच्या गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत केवळ 42 धावा दिल्या आणि राजस्थानचा 20 धावांनी पराभव केला. या विजयामुळे दिल्ली 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला तर राजस्थान दुसऱया स्थानावर कायम आहे.

दिल्लीने जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या 20 चेंडूंतील 50 आणि अभिषेक पोरेलच्या 65 आणि ट्रिस्टन स्टब्सच्या 41 धावांच्या घणाघातामुळे दिल्लीने 8 बाद 221 धावा केल्या होत्या तर या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनच्या 6 षटकार आणि 8 चौकारांनिशी 46 चेंडूंत ठोकलेल्या 86 धावांच्या खेळीने राजस्थानला विजयासमीप नेऊन ठेवले होते. पण 18 चेंडूंत माफक 41 धावांची गरज असताना कुलदीप यादवने 4 धावांत 2 विकेट टिपत सामना दिल्लीच्या दिशेने फिरवला. त्याची हीच कामगिरी विजयाला कारणीभूत ठरली. राजस्थानचा संघ 8 बाद 201 धावाच करू शकला.

11 मेपर्यंत लांबला प्ले ऑफचा सस्पेन्स

आयपीएलचा थरार क्लायमॅक्सच्या दिशेने पोहोचला असला तरी प्ले ऑफमध्ये कोणता संघ खेळणार याचा 56 सामन्यांनंतरही पैसला लागलेला नाही. राजस्थान रॉयल्सला सलग दुसरा पराभव सहन करावा लागल्यामुळे ते 16 गुणांसह दुसऱया स्थानावर आहेत. दिल्लीने आज विजय मिळवत आपल्या प्ले ऑफ खेळण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सध्या तालिकेतील अव्वल पाचही संघांचे 18 गुण होण्याची शक्यता असल्यामुळे अद्याप एकही संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला नाही आणि पुढील काही लढतीतही हा सस्पेन्स कायम राहणार आहे. 11 मे रोजी कोलकाता आणि मुंबई यांच्यात होणाऱया सामन्यात कोलकात्याने बाजी मारली तर कोलकाता प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरू शकतो. तोपर्यंत प्ले ऑफचा सस्पेन्स कायम राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button