breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मशिदीवरील भोंग्याचा कायमचा निकाल लावायचाय, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई: मशिदीवरील भोंग्यांचा विषय थंड होत असल्याचं चित्र असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा या विषयाला हवा दिली आहे. राज ठाकरेंनी यांनी आज एक पत्र ट्विट करत मनसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मशिदीवरील भोंग्याचा एकदाच निकाल लावायचाय, कामाला लागा, मशिदीवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचाय, असं म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाबाबत आपली आक्रमक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचंय असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याच पत्राबाबत त्यांनी आज ट्विट करत मनसैनिकांना आदेश दिले आहेत. माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील – घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे, असे निर्देश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.

राज ठाकरे पत्रात काय म्हणाले?

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.

तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील – घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही.. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही…

मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंची आक्रमक भूमिका

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईसह राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर लाऊडस्पीकर्स लावून हनुमान चालीसा पठण केले होते.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेतही मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मशिदींवरील भोंगे न उतरल्यास त्याठिकाणी जाऊन लाऊडस्पीकरवरून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले होते.

मनसेच्या या आंदोलनानंतर राज्यातील काही मशिदींमध्ये पहाटे सहा वाजण्यापूर्वीची स्पीकरवरून होणारी अजान बंद झाली. या मुद्द्यावरून मनसेला अपेक्षित असलेले आक्रमक आंदोलन झाले नसले तरी राज ठाकरे यांच्या भूमिकेला काही प्रमाणात यश मिळाल्याची चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button