breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीय

ग्राऊंड रिपोर्ट : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत गेल्यास पिंपरी-चिंचवड ‘राष्ट्रवादीमुक्त’?

भाजपाचे महेश लांडगे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे ‘विरोधक मुक्त’ : राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना ‘भगवा’ खांद्यावर घ्यावा लागणार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
राज्यातील राजकीय घडमोडी प्रचंड वेगात सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार यांची गेल्या काही दिवसांतील भाजपाविरोधातील मवाळ भूमिका बोलकी आहे. त्यामुळे उद्या अजित पवार भाजपासोबत गेल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय स्थिती कशी असेल? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

२०१४ मध्ये राष्ट्रवादीतील धुरंधर नेते स्व. लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश करुन घेतला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील नगरसेवकांचा मोठा गट भाजपात दाखल झाला. महापालिकेतील सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली. आता अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास उरले-सुरले नेते भाजपात दाखल होतील आणि पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीमुक्त होईल, असा दावा राजकीय जाणकारांकडून केला जात आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना साथ दिली. भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आवडला नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता. आता अजित पवार यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीतील नाराज झालेला आणि भाजपाविरोधी गटाला पुन्हा नवा राजकीय आश्रय शोधावा लागेल, असाही दावा केला जातो.

प्रभाग, बूथ स्तरावर काम करुन भाजपाचा प्रचंड विरोध करणारे निष्ठावंत कार्यकर्त्यांना उद्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घ्यावे लागेल. आजच्या घडीला राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले, तरी ‘कंट्रोल’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिसतो. त्याचप्रमाणे उद्या अजित पवार मुख्यमंत्री झाले किंवा राष्ट्रवादी आणि भाजपाची युती झाली, तरी ‘रिमोट कंट्रोल’ भाजपाकडेच राहणार आहे. त्याचीच प्रचिती स्थानिक पातळीवर येईल आणि भाजपाच्या नेत्यांचा वरचष्मा राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना भाजपासोबत जुळवून घेणे किंवा राजकीय दिशा बदलणे हे दोनच पर्याय राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे सर्व धुरा केवळ अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. येथील पदाधिकारी आणि नेत्यांना पुरोगामी किंवा प्रतिमागी अशा विचारधारांबाबत काहीही देणे-घेणे नाही. ‘‘अजित पवार बोले आणि पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी चाले..’’ अशी स्थिती आहे. पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमाला होणारी गर्दी आणि अजित पवार यांच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी यातील फरक पाहिला, तर ही बाब प्रकर्षाने लक्षात येते. त्यामुळे अजित पवार अस्थिर झाले, तर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या गडाला भेगा पडतात. संभाव्य प्रवेश झालाच तर विधानसभा नव्हे, तर महापालिकेतील राष्ट्रवादीचे संख्याबळसुद्धा घटेल, ही वस्तुस्थिती आहे.


भ्रष्टाचार हा निवडणुकीचा मुद्दा राहणार नाही…

पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची सत्ता आली. तत्पूर्वी, १५ वर्षे राष्ट्रवादीची महापालिकेत एकहाती सत्ता होती. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि काही भाजपाविरोधकांनी भ्रष्टाचार हा निवडणुकीचा मुद्दा केला. भाजपा काळात मोठा भ्रष्टाचार आणि त्याची यादीच लोकांसमोर ठेवली. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढवली जाईल, अशी स्थिती होती. मात्र, अजित पवार यांच्या भाजपाच्या कथित प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाल्या आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा मागे पडला.आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर उर बडवून काहीही हाताला लागणार नाही. स्मार्ट सिटी योजनेपासून भामा आसखेडमधील जॅकवेलच्या निविदेपर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक आरोप राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केले. उद्या अजित पवार भाजपासोबत गेले, तर सर्व आरोप आणि पत्रके बासनात गुंडाळून ठेवावी लागणार आहेत.


लांडगे, बारणे विरोधक मुक्त…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांना भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत दोन हात करावे लागत होते. अजित पवारांच्या संभाव्य भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीतील स्थानिक नेते एकतर भाजपात प्रवेश करतील किंवा राजकीय आत्मसमर्पण करतील. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी जाहीरपणे भाजपाला साजेशी भूमिका घेतली किंवा स्व. लक्ष्मण जगताप यांच्या मैत्रीबाबत सहवेदना दाखवली. तशीच आत्मियता राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनीही दाखवली. मध्यंतरी, लांडे यांच्या शिक्षण संस्थेला मदत केल्याबद्दल त्यांनी जाहीरपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले होते. अजित पवार यांच्या मागे अनेक दिग्गज नेते राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपासोबत जुळवून घेतीलच आणि प्रसंगी खांद्यावर ‘भगवा’ घेवून मिरवतील. त्यामुळे आमदार महेश लांडगे आणि खासदार श्रीरंग बारणे यांचे विरोधक एकप्रमारे मित्र होतील, असे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील सत्तेचे ‘सूत्रधार’ राहतील आणि फडणवीस यांच्या जवळचा किंवा निष्ठावंत म्हणून आमदार महेश लांडगे यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये वरचष्मा राहील, असा दावा केला जातो.


आमदार बनसोडेंच्या रुपाने पिंपरीत ‘कमळ’ फुलणार!

पिंपरी विधानसभा मतदार संघाचा विचार करता मतदार संघाच्या निर्मितीपासून या मतदार संघात भाजपाला यश मिळालेले नाही. विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या रुपाने मतदार संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेची ताकद तुल्यबळ आहे. उद्या कदाचित अजित पवार यांच्यासोबत अण्णा बनसोडे भाजपावासी झाले, तर राष्ट्रवादीला हा मतदार संघ मगवावा लागेल. चिंचवड, भोसरीसह पिंपरीतसुद्धा भाजपाचे ‘कमळ’ फुलेल. कारण, भाजपाला कोणत्याही प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व संपुष्टात आणायचे आहे. यासह पिंपरीत भाजपाकडे बनसोडेंसारखा प्रभावी चेहरा नाही. याउलट, भाजपातील काही नाराज बनसोडे भाजपासोबत जातील आणि आपल्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल. त्याद्वारे विधानसभा सदस्य बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशा प्रतिक्षेत आहेत. त्यासाठी अजित पवार यांच्याकडे ‘पिंगा’ घालत आहेत. त्यांचा पुरता भ्रमनिरास होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.


भाजपातील घरभेद्यांची राजकीय कोंडी

महाविकास आघाडीची सत्ता २०१९ मध्ये राज्यात स्थापन झाली. त्यानंतर अडीच वर्षांच्या काळात पिंपरी-चिंचवड भाजपामधील नाराज नगरसेवकांनी उसळी घेतली. भाजपाविरोधात थेट भूमिका घेत यकाहींनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. तर काहीजणांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्ष्य करण्यास सुरूवात केली. तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भरोश्याने भाजपाविरोधात मैदानात उरलेल्या आणि भाजपामध्येच कुरघोडीचे राजकारण करणाऱ्या अतृत्प आत्म्यांची आता राजकीय कोंडी झाली आहे. अजित पवार भाजपात जातील, अशी शक्यता असल्याने स्थानिक पातळीवर आपली अडचण होणार आणि राजकीय भविष्य संघर्षमय होणार, अशी धास्ती अनेकांनी घेतली आहे. राज्यात राजकीय उलथापालथ झाली, तरी प्रभागात स्थानिक नेत्यांचीच मदत घ्यावी लागते. त्यामुळे काही भाजपाविरोधकांची झोप उडाली आहे, असा दावा भाजपासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button