breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#RainUpdates: येत्या ५ दिवसांत राज्यात तुफान पाऊस

मुंबई : राज्यात शुक्रवारी दाखल झालेल्या मान्सूनने सोमवारी संपूर्ण कोकण व्यापले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये मान्सून दाखल झाला आहे. मात्र, मान्सूनची ही प्रगती धिम्या गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मान्सूनने हजेरी लावल्यानंतर पावसाने ब्रेक घेतला आहे. पण येत्या ४८ तासांमध्ये संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भातील काही भागांमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनार्‍यावर ऑफ-शोअर ट्रफ आणि पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाखाली येत्या ५ दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची उपस्थिती

मान्सून दाखल झाल्यानंतर सध्या पावसाचे प्रमाण फारसे नसले तरी अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर द्रोणीय स्थिती तसेच पश्चिमेकडून वाहणारे वारे यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची उपस्थिती असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

यातील काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी सर्वदूर पावसाची शक्यता आहे. मान्सूनला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि उर्वरित महाराष्ट्रात चांगल्या मान्सूनच्या पावसासाठी हवी असलेली आवश्यक ऊर्जा पुरवण्यासाठी ही स्थिती अनुकूल आहे, असे मत निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले. दरम्यान, मुंबई आएमडीनुसार, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणात सलग १८ जूनपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गोव्यातही पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातही संपूर्ण आठवडा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • पावसाची तूट

पावसाची उपस्थिती नियमित नसल्याने संपूर्ण राज्यात सध्याच्या अपेक्षित पावसापेक्षा ४४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात जळगाव, कोल्हापूर, सातारा, मराठवाड्यात हिंगोली, जालना येथे अतिरिक्त तूट आहे. विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम या तीन जिल्ह्यांमध्येही तूट असून इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त तूट आहे. त्यामुळे मान्सून आगमनाबरोबरच प्रत्यक्ष पावसाच्या अनुभवाचीही नागरिकांना प्रतीक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button