breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाविकासआघाडीतील मंत्र्यांनी नुसतं खुर्च्यांवर बसू नका, तर…- खासदार संजय राऊत

मुंबई |

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेनंतरही प्रत्युत्तर न देणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे. विरोधकांना उत्तर देण्याचं काम केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे किंवा मीच देणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच महाविकासआघाडीतील मंत्र्यांनी नुसतं खुर्च्यांवर बसू नये. सत्तेचा उपभोग घेणाऱ्या सर्वांनी विरोधकांना प्रत्युत्तर देणं ही त्यांची जबाबदारी आहे, असंही राऊत यांनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “माझं महाविकासआघाडीतील सर्वच मंत्र्यांना आवाहन आहे. नुसते खर्च्यांवर बसू नका. प्रतिहल्ले करा. आघाडीच्या नेत्यांनी फक्त खुर्चीवर न बसता हल्ल्याला प्रतिहल्ला, टोल्याला प्रतिटोला दिला पाहिजे. विरोधकांना शरद पवार, सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा फक्त मीच उत्तर देणार का? तुम्ही काय करताय? जे जे खुर्चीवर बसलेत, सत्तेचा उपभोग घेत आहेत त्या सर्वांची ही जबाबदारी आहे. या सर्वांना बोलावं लागेल. सरकारची प्रतिमा जपण्यासाठी सर्वांना समोर येऊन बोलावं लागेल. हे ८ दिवसात पळून जातील.”

  • “मोदी पाकिस्तानात जाऊन केक कापतात, मिठ्या मारतात, आता काश्मीरवर बोला”

“आम्ही सातत्याने सांगतोय पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेऊ नका. राजकीय, आर्थिक, व्यापारी किंवा सांस्कृतिक कोणतेही संबध ठेऊ नका हीच आमची कायम भूमिका राहिलीय. मोदी तिकडं जाऊन केक कापतात, मिठ्या मारतात. तसं आम्ही करत नाही. काश्मीर प्रश्नाची जबाबदारी विरोधी पक्षावर का टाकता? तुम्ही सांगा काय करणार आहात ते. दुबईत क्रिकेट खेळताय का खेळत नाही ते सोडा, जम्मू काश्मीरवर बोला. तिथं काय करणार आहात ते बोला,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

  • “ईडी, सीबीआय, एनसीबीला जम्मू काश्मीरमध्ये पाठवा”

संजय राऊत म्हणाले, “ईडी, सीबीआय, एनसीबीला जम्मू काश्मीरमध्ये पाठवा. ते फार पावरफूल लोकं आहेत. अतिरेकी पळून जातील. तुम्ही इथं आमच्यावर ईडी, आयटी, एनसीबीच्या माध्यमातून आमच्यावर हल्ले करत आहात. तुम्ही या तिन्ही चारही संस्था बदनाम केल्यात. राजकीय वापराच्या ठपक्यामुळे या संस्था बदनाम झाल्यात. याना सगळ्यांना काश्मीरमध्ये पाठवा. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. दहशतवाद्यांचे कागदपत्रं आम्ही सोमय्यांना देऊ. जम्मू, काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला असं फिरत बसतील.”

  • “चंद्रकांत पाटलांनी काश्मीरला जाऊन अतिरेक्यांना दम द्यावा, आम्हाला शहाणपणा शिकवू नये”

“शरद पवार यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी ज्या एकेरी शब्दात उल्लेख केला. कुठं शरद पवार, कुठं तुम्ही, कुठं हिमालय, कुठं टेकडी, टेकाड, टेंगुळ. त्यांना हे शोभतं का? त्यांनी काश्मीरला जाऊन अतिरेक्यांविषयी बोलावं. त्यांना दम द्या, आम्हाला शहाणपणा शिकवू नका,” असंही राऊत यांनी नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button