breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

#RainAlert: मान्सूनने बहुतांश महाराष्ट्र व्यापला! मात्र सरासरीपेक्षा पाऊस कमीच

पुणे : मान्सूनने गुरुवारी विदर्भासह बहुतांश महाराष्ट्र व्यापल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली. मान्सूनने सर्वसाधारण कालावधीमध्ये राज्याचा बहुतांश भाग व्यापला असला, तरी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले आहे.

सिंधुदुर्गातील वेंगुर्ला येथे दहा जूनला दाखल झाल्यानंतर पुढील सहा दिवसांत मान्सूनने बहुतांश महाराष्ट्र व्यापला आहे. हा कालावधी मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाच्या सर्वसाधारण कालावधीशी मिळता जुळता आहे. गेले दोन दिवस विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्याच्या पूर्व भागात गुरुवारी मान्सूनची प्रगती जाहीर करण्यात आली. मान्सूनच्या प्रगतीची उत्तरसीमा सध्या पोरबंदर, भावनगर, खांडवा, गोंदिया, दुर्ग, भवानीपटना, कलिंगपटनम, बलूरघाट आणि सुपौल येथून जात आहे. हवामान अनुकूल असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गुजरात, मध्यप्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंतच्या क्षेत्रात आणखी मजल मारू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

आयएमडीच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार एक ते १६ जून या कालावधीत कोकणात ९९.४ मिमी (सरासरीपेक्षा ५८ टक्के कमी), मध्य महाराष्ट्रात २८.३ मिमी (सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी), मराठवाड्यात ४१.४ मिमी (सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी) आणि विदर्भात १६.३ मिमी पावसाची (सरासरीपेक्षा ७१ टक्के कमी) नोंद झाली. मान्सूनचे वारे अनुकूल असले तरी मोठ्या पावसासाठी कारणीभूत ठरणारे मेडन ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) हे ढगांचे क्षेत्र या कालावधीत भारतासाठी अनुकूल नसल्याने पावसाचे प्रमाण कमी राहिले, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन जाहीर होऊनही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने विशेष हजेरी न लावल्याने खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. आयएमडीने गुरुवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार १८ ते २० जून या कालावधीत राज्याच्या किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा वेग वाढणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • ईशान्येत विक्रमी पाऊस

    ईशान्येकडील राज्यांत मान्सून सध्या सक्रिय असून, गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीच्या घटनांची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेघालयातील चेरापुंजी आणि मौसिमराम या ठिकाणी गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जूनमधील विक्रमी पावसाची नोंद झाली. चेरापुंजी येथे ८११.६ मिमी हा आतापर्यंतचा सातव्या क्रमांकाचा; तर मौसिमराम येथे ७१०.६ मिमी हा आतापर्यंतचा पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस नोंदला गेला. पुढील दोन दिवस आसाममध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, अतिवृष्टीच्या घटनांमुळे पूर, भूस्खलन आणि दरडींची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button