ताज्या घडामोडीमुंबई

रेल्वेतील गुन्ह्य़ांचे प्रमाण निम्म्यावर

रेल्वे उपनगरीय गाडय़ा व रेल्वे स्थानकात मागील दोन वर्षांपासून प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे.

वसई | रेल्वे उपनगरीय गाडय़ा व रेल्वे स्थानकात मागील दोन वर्षांपासून प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे. त्याचा परिणाम हा रेल्वेत घडणाऱ्या गुन्ह्यंवरही झाला आहे. मागील साडेचार महिन्यांत वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत २४३ इतके गुन्हे घडले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्यावर आले आहे.वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारित मीरा रोड ते वैतरणा अशा सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. या स्थानकातून मोठय़ा संख्येने प्रवासी प्रवास करतात. यात विरार, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोड ही सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. याच गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरी, सोनसाखळी चोरी, पाकीटमारी यासह इतर छोटे-मोठे गुन्हे घडत असतात. यात काही भुरटय़ा चोरांच्या टोळ्या ही सक्रिय आहेत. विशेषत: करून रेल्वेच्या दारात उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल हिसकावून पळ काढणे यासह विविध प्रकारे गुन्हे केले जातात.परंतु मागील दोन वर्षांपासून करोनाचे संकट आल्याने पश्चिम रेल्वेवरून होणारी रेल्वेची प्रवासी वाहतूक ही अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी आहे.

याचाच परिणाम रेल्वेत होणाऱ्या गुन्ह्यंवर दिसून आला आहे. मीरा रोड ते वैतरणा या स्थानकांच्या दरम्यान सन २०१९ मध्ये १५ मे पर्यंत १ हजार ५६ इतक्या गुन्ह्यंची नोंद करण्यात आली होती. तर सन २०२०, १५ मेपर्यंत मध्ये ४९६ इतके गुन्हे घडले होते. तर चालू वर्षांत मेपर्यंत हेच प्रमाण २४३ गुन्ह्यंवर आले आहे. म्हणजेच ५० टक्क्यांनी रेल्वेत घडणाऱ्या गुन्ह्यंचे प्रमाण कमी झाले असल्याचे दिसून येत आहे.यात विशेषत: पाकीटमारी, सोनसाखळी व मोबाइल चोरी यांचा समावेश असल्याची माहिती वसई रेल्वे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली आहे. तसेच या गुन्ह्यंचे प्रमाण कमी व्हावे यासाठी विविध ठिकाणच्या स्थानकात, संशयित ठिकाणे अशा ठिकाणी गस्त घालण्याचे कामही पोलीस कर्मचारी यांच्यामार्फत केले जात असल्याची माहिती वसई लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

गुन्हे उघडकीस आणण्याचे पोलिसांपुढे आव्हान

रेल्वेत व रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेक गुन्ह्यंचे प्रकार घडत असतात. या गुन्ह्यंचा शोध घेणे हे रेल्वे पोलिसांच्या समोरील मोठे आव्हान आहे. गुन्हे केवळ रेल्वे स्थानकातच नाही तर रेल्वेगाडय़ाची ज्या ठिकाणी गती कमी होते अशा ठिकाणी काही भुरटे चोर हे हातावर काठीने फटका मारून मोबाइल चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा विविध प्रकारच्या चोरीच्या घटनांचा शोध घेणे ही कठीण काम आहे. सन २०१९, १५ मे पर्यंत १०५६ इतके गुन्हे घडले त्यातील केवळ १७५ गुन्ह्यंचा शोध लागला तर ८८१ बाकी आहेत. २०२० मध्ये ४९६ पैकी ७५ उघडकीस आले तर ४२१ अजूनही बाकी आहेत. चालू २०२१ मध्ये २४३ गुन्ह्यंपैकी ६८ गुन्हे उघडकीस आले असून अजूनही १७५ गुन्ह्यंचा शोध सुरू आहे.

गुन्ह्यंना आळा घालण्यासाठी उपाययोजना

प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेऊन भुरटय़ा चोरांच्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. रेल्वे स्थानक परिसर आणि लोकल गाडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाकीट, मोबाइल या वस्तूंची चोरी होत असते. या चोरीच्या गुन्ह्यत जवळपास ८० टक्के प्रमाण हे मोबाइल चोरीचे आहे. या गुन्ह्यंना आळा बसावा यासाठी रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच स्थानिक व स्थानके मिळून नियंत्रण कक्ष ही स्थापन करण्यात आला आहे. यातून गुन्ह्यंचा शोध घेणे शक्य झाले आहे. या यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यात गुन्हेगार हद्दीत शिरल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button