TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

दर्जाचा आग्रह धरणे स्वागतार्ह! ; पुरुषोत्तम करंडकच्या निकालाबाबत ज्येष्ठ रंगकर्मी, नाटय़समीक्षक माधव वझे यांची परखड भूमिका

पुणे : सर्वच क्षेत्रांत सवंगपणा येत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे परीक्षक दर्जाचा आग्रह धरत असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटय़समीक्षक माधव वझे यांनी मांडली.

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे घेण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील ‘पुरुषोत्तम करंडक’ माधव वझे यांचे वडील पुरुषोत्तम रामचंद्र वझे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. नुकत्याच झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या निकालात पात्रतेअभावी पहिला क्रमांक विजेत्या संघाला पुरुषोत्तम करंडक न देण्याचा, वैयक्तिक पारितोषिकांचा करंडक न देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच झाला. या निर्णयावरून नाटय़क्षेत्रात ‘वादांकिका’ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वझे यांनी त्यांची भूमिका मांडली. 

वझे म्हणाले, की महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेचे स्वरूपच प्रायोगिक आहे. या संस्थेत मी स्वत: अनेक वर्षे होतो. पुरुषोत्तम करंडक १९६३ मध्ये सुरू झाला तेव्हा कलोपासकांच्या कार्यकारिणीत मी होतो, स्पर्धेचे नियम तयार करण्याच्या प्रक्रियेतही माझा सहभाग होता. त्या नियमांतच नमूद केलेले आहे, की परीक्षकांना एकांकिकांचा दर्जा नसल्याचे वाटल्यास करंडक देऊ नये. त्यामुळे जे झाले ते नियमानुसार झाले. स्पर्धेच्या अन्य नियमांतील विद्यार्थी लेखक, विद्यार्थी दिग्दर्शक, सूचक नेपथ्य हे सगळे प्रायोगिकतेकडेच जाणारे आहे. निकालामध्ये एकांकिकेला पहिला क्रमांक नाकारलेला नाही, तर पुरुषोत्तम करंडक हा मान असल्याने दर्जाअभावी तो मान पहिल्या क्रमांकाच्या एकांकिकेला देण्यात आला नाही. एकांकिकेचा दर्जा नसल्याचे मत मांडणे हा परीक्षकांचा अधिकार आहे.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत मी स्पर्धक आणि परीक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये काम केले आहे. मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिकही मिळाले होते. प्रेक्षक म्हणून अनेक वर्ष स्पर्धा पाहिली आहे. पुरुषोत्तम करंडक न देण्याच्या दर्जाच्या एकांकिका या पूर्वीही झाल्या. त्यावेळीही करंडक का दिला गेला, असा प्रश्न पडला. अखेर यंदाच्या परीक्षकांनी करंडक न देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे खरेतर स्वागत करायला हवे. हा रंगमंच विद्यार्थ्यांनी त्यांच्या संवेदना मांडाव्यात यासाठी आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपण काय करतो आहोत, कसे मांडतो आहोत याचाही विचार केला पाहिजे, जाणकारांशी बोलायला हवे, आवश्यकतेनुसार तालमी करणे आवश्यक आहे. मात्र एकांकिकांच्या सादरीकरणात सवंगपणा येऊ लागला आहे. अर्थात हा सवंगपणा सर्वच क्षेत्रात येत आहे. या सवंगपणाकडे जाण्यापासून रोखत दर्जाचा आग्रह ‘पुरुषोत्तम’च्या यंदाच्या परीक्षकांनी धरला असल्यास त्यात वावगे नाही. उलट त्याचे स्वागत केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

‘विद्यार्थ्यांना भडकावले जाऊ नये!’

परीक्षकांची सविस्तर भूमिका मांडावी परीक्षकांचे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत काहीही हितसंबंध नाहीत. करंडक न दिल्याने मुलांना राग येणे, वाईट वाटणे स्वाभाविक. पण प्रौढांनी समजून घेऊन मुलांना समजावून सांगितले पाहिजे. विद्यार्थ्यांना भडकावले जाऊ नये. पारितोषिक वितरण कार्यक्रमात परीक्षकांनी निकालाबाबत सविस्तर भूमिका मांडायला हवी, असेही वझे यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button