breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराष्ट्रिय

आफताबची कोर्टात कबुली… मी जे केलं ते रागाच्या भरात केलं

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

श्रद्धा हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताब याने आतापर्यंत सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, या माहितीत किती तथ्य आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय. दरम्यान, मी जे काही केलं ते रागाच्या भरात केलं, अशी कबुली आफताबने आज न्यायालयात दिली. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आज दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसंच, पॉलिग्राफी चाचणीला अफताबने परवानगी दिली आहे. त्यानुसार, आता न्यायालयानेही त्याच्या पॉलिग्राफी चाचणीला परवानगी दिली आहे.

एकूण १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात येते. आतापर्यंत ५-५ दिवसांची दोनवेळा कोठडी देण्यात आली आहे. त्यानुसार, आता चार दिवसांची कोठडी वाढवण्यात आली आहे. यादरम्यान पॉलिग्राफी चाचणी होईल आणि त्यानंतर नार्को चाचणीही करण्यात येणार आहे. आफताबकडून गुन्ह्याची कबुली घ्यायची आणि त्याच्याविरोधात सर्व पुरावे गोळा करायचे हे मोठं आव्हान पोलिसांसमोर आता असणार आहे. यासाठी पोलिसांकडे अवघे चार दिवस राहिले आहेत.

आफताबने हिट ऑफ मोमेंट या संज्ञेचा वापर केला आहे. म्हणजेच, त्याच्या हातून जे कृत्य झालं आहे ते रागाच्या भरात झालं आहे. याचा अर्थ आफताब स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येतंय. १८ मेच्या रात्री आफताब आणि श्रद्धा यांच्यात मोठा वाद झाला होता, असं पहिल्यापासूनच सांगण्यात येतंय. आफताबने सांगितल्यानुसार वादादरम्यान श्रद्धाने त्याच्या अंगावर काहीतरी फेकलं, याचा राग आला म्हणून त्याने प्रतिहल्ला केला. ती शांत होत नाही तोवर त्याने तिचा गळा दाबून ठेवला होता, अशी माहिती त्याने दिली होती.

मी चौकशीला सहकार्य करत असल्याचा दावा आफताबने केला आहे. परंतु, सहा महिन्यांपूर्वी हत्या झाल्याने त्याला आता काही आठवत नसल्याचंही त्याने कोर्टाला सांगितलं. दरम्यान, त्याच्या जबाबात सातत्याने बदल होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आफताबने हत्येविषयी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी १४ टीम वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केल्या आहेत. तसंच, आफताबने मॅप बनवून पुरावे कुठकुठे टाकले आहेत याची माहिती दिली आहे. श्रद्धाची कवटी त्याने तलावात फेकली असल्याची माहिती आज त्याने कोर्टाला दिली. जबड्याचा हिस्सा पोलिसांनी ताब्यात घेतला असून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत आफताबवर नार्को टेस्ट करण्याचे आदेश न्यायालयाने रोहिनी फॉरेन्सिक सायन्स लॅबला दिले आहेत. तसंच, हे प्रकरण आता दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात यावे अशी मागणीही दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button