पुण्यातील युवकांनी देहू ते पंढरपूर धावत केली रन वारी; तीन दिवसात 230 किलोमीटर धावत पोहचले पंढरीला

पुणे : पंढरपुरला आषाढी पायी वारीला जावू विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यास, वीस पंचवीस दिवस सुट्टी काढणे शक्य होत नाही. त्यामुळे नोकरदार असलेल्या युवकांनी एकत्रित येत, निरोगी आरोग्याचा संदेश देत, रन ग्रुपच्या वतीने देहू ते पंढरपूर अशी 230 किलोमीटर धावत रन वारी पूर्ण करून, रन ग्रुपच्या युवकांनी आदर्श निर्माण केला आहे.
देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेवून, गुरूवारी दि. 12 जून रोजी रन वारीला सुरवात करून, पहिल्याच दिवशी देहू ते तरडगाव अशी 100 किलोमीटर धावले, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दि. 13 रोजी तरडगाव ते माळशिरस अशी 80 किलोमीटर धावले, त्यानंतर शनिवारी दि. 14 रोजी माळशिरस ते पंढरपूर अशी 50 किलोमीटरची वारी पूर्ण करून, पंढरपूर येथे श्री संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेवून रन वारीची सांगता केली.
हेही वाचा – रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यात पावसाचा जोर कायम
रन वारी दरम्यान, पुणे ते पंढरपूर पालखी विसावा असणाऱ्या विविध ठिकाणी, आंबा, कवठ आणि कडुलिंबाच्या अशा फळांची व ऑक्सिजनच्या 80 वृक्षांचे रोपण करून, पर्यावरण रक्षणाचा व जनजागृतीचा संदेश दिला. रन वारीचे हे पाचवे वर्ष असून, पुढील वर्षी अधिक संख्येने युवकांच्या सहभागाने रन वारीला येवू असा निर्धार त्यांनी केला. बा विठ्ठला..! जगाला शांती दे व जगाचे रक्षण कर, सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे, असे विठ्ठल चरणी साकडे घातले.
यावेळी रन वारीची संकल्पना मांडणारे भूषण तारक, वारी समन्वयक दिगंबर जानभर्रे, नंदकिशोर मुसळे, अजित गोरे, तसेच ही रन वारी यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे मेंबर राजेश चिट्टे, महेंद्र सोनवणे, दुर्गा जाधव, सुजाता जाधव, प्रशांत भोसले, आशितोष गोलविलकर, लक्ष्मीकांत कुलकर्णी, राजेश नाळे, शैलेश झरेकर, चंद्रकांत जाधव, आरती जाधव, चालक आकाश पांचाळ यांनी मेहनत घेतली.