सुरक्षारक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी केला ‘हा’ धक्कादायक प्रकार…
![What a shocking way to get a job as a security guard ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/What-a-shocking-way-to-get-a-job-as-a-security-guard-....png)
पुणे| कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. जवळपास दोन वर्षे चाललेल्या लॉकडाऊननंतरसुद्धा अनेकांना नोकरी मिळवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पिंपरी चिंचवड मधील सुरक्षारक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी घडलेला ह्या धक्कादायक प्रकारवरून बेरोजगारीचा आणि नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो.
सुरक्षारक्षक म्हणजे बँका, सरकारी रुग्णालये, कार्यालये किंवा खाजगी मालमत्ता असलेल्या घरांच्या, कार्यालयांच्या बाहेर शांतपणे उभा असलेला व्यक्ती. सरकारी सुरक्षारक्षकांची आर्थिक परिस्थिती काहीशी ठीक असली तरी कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाला त्याप्रमाणात वेतन कमीच मिळतं. भारतात साधारणपणे एक सुरक्षारक्षक वर्षाला दीड ते तीन लाख रुपये कमावतो. साधारणपणे एवढंच किंवा त्याहून थोडं अधिक किंवा कमी पैसे मिळवून देणाऱ्या नोकरीसाठी एका ४६ वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाला आहे.
‘या’ कारणामुळे घडला सर्व प्रकार…
उत्तरप्रदेशातील बिट्टू उर्फ ऋषीपाल यादव असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून बिट्टू यादव पिंपरी चिंचवड मधील रावेत येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. बिट्टू काम करत असलेल्या ठिकाणी आरोपी संजय चौहान याला काम करण्याची इच्छा होती. मात्र, ही नोकरी बिट्टू यादवला मिळाली आणि संजय चौहान याने याच गोष्टीचा राग मनात ठेवला होता.
नोकरीच्या कारणावरून दोघांमध्ये रात्री नऊ च्या सुमारास बाचाबाची झाली आणि पुढे हा वाद इतका विकोपाला गेला की एका साध्या सुरक्षारक्षकाच्या नोकरीपोटी संजय यादव याने बिट्टू यादवचा दगडाने ठेचून खून केला. रावेत पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल जाधव यांनी घटनेच्या तीन तासात आरोपीस अटक केली असून या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.