ताज्या घडामोडीपुणे

वैष्णवांच्या मेळ्यासमवेत शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’

यवत आणि सासवड येथे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा ‘संवादवारी’ उपक्रम स्तुत्य असून प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्याप्रकारे मिळते, अशी प्रतिक्रिया पालखीतळाच्या ठिकाणी आयोजित प्रदर्शनाला भेट देणाऱ्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित संवादवारी उपक्रमांतर्गत ३० पॅनल असलेले प्रदर्शन, एलईडी व्हॅन व त्यावर नाट्यपथक, आकर्षक चित्ररथ, पथनाट्याद्वारे राज्य शासनाच्या विभागनिहाय योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. काल (दि. ३) श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा दुसऱ्या दिवसाचा सासवड येथे आणि श्री संत तुकाराम महाराज पालखीचा यवत येथे मुक्काम होता. त्यादरम्यान या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गतिमान प्रशासन, गुणवत्तापूर्ण शिक्षण; उज्ज्वल भविष्याचे संवर्धन, महाराष्ट्राच्या मातृभाषेचे जतन आणि संवर्धन, महिला आणि ज्येष्ठांच्या प्रवासासाठीच्या सवलत योजना आदी विविध योजनांची माहिती असलेले माहिती फलक प्रदर्शनात मांडण्यात येत आहेत. संध्याकाळी मुक्कामाच्या वेळी वारकी प्रदर्शनाला आवर्जुन भेट देतात आणि योजनांची माहिती जाणून घेतात. प्रदर्शनाची मांडणी आणि मिळणाऱ्या माहितीमुळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

पालखी सोहळ्यासोबत असलेला चित्ररथही वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे. चित्ररथावर समोरच्या बाजूस विठ्ठलाची प्रतिमा असल्याने वारीसोबत असलेल्या भाविकांची पावले चित्ररथाकडे वळतात. एका चित्ररथावर मंदिराच्या रचनेप्रमाणे स्तंभ उभारण्यात आले आहेत, तर दुसऱ्या चित्ररथावर दीपमाळ, मांगल्याचे प्रतिक आणि पर्यावरण समृद्धीचा संदेश देणारा पिंपळवृक्ष प्रदर्शित करण्यात आला आहे. पिंपळाच्या पानावर शासनाच्या विविध योजना दर्शविण्यात आल्या आहेत. चित्ररथावर असलेले लोककलावंत विठुनामाचा गजर करत वारकऱ्यांना माहिती देतात. अनेक ठिकाणी वारकरी चित्ररथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत.

वारीसोबत चालणाऱ्या एलईडी व्हॅनवरील मोठ्या पडद्यावर दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जाते. लोककला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन, विठुनामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जाते आणि त्यासोबत स्वच्छता आणि आरोग्याचे संदेशही देण्यात येतात. त्यामुळे या पथकासभोवतीही गर्दी दिसून येत आहे. विसाव्याच्या ठिकाणी थकवा दूर करताना वारकरी बांधवांचे मनोरंजनही होते आणि सोबत विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याने ‘संवादवारी’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सत्यवान गवस, दिघी, पुणे
राज्यशासनाने समाजातील सर्व घटकांसाठी लोककल्याणकारी योजना आणल्या असून त्या उपयुक्त आहेत. त्याचा लाभ वारकऱ्यांनी घेतला पाहिजे. दरवर्षी पालखीसोबत हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. समाजातील सर्व स्तराला योजनांची माहिती मिळून लाभ घेता येतील. या उपक्रमाबद्दल शासनाचे आभार!

बबन गायकवाड, डोंगरगाव, ता. हवेली, जि. पुणे
मनोरंजनातून शासकीय योजनांची जनजागृती आणि भव्य प्रदर्शन असा दुहेरी संगम संवादवारी उपक्रमाद्वारे साधण्यात येत आहे. वारकऱ्यांसोबत समाजाला मार्गदर्शन करणारा हा कार्यक्रम आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button