‘मुलांच्या विकासासाठी मातृभाषेला पर्याय नाही’; खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे : लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्याच्या भावभावना मांडण्यासाठी मातृभाषेचा आधार घेते. मुलांच्या भावविश्वाच्या विकासासाठी मातृभाषेशिवाय पर्याय नाही, असे मत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या बालकुमार दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, प्रमुख पाहुणे प्रवीण मसालेचे संचालक विशाल चोरडिया, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, विश्वस्त ज. गं. फगरे, डॉ. मंदा खांडगे, कार्यवाह डॉ. दिलीप गरुड आदी उपस्थित होते.
घराघरांत मराठीचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी पालकांनी मुलांशी आवर्जून मराठीत बोलले पाहिजे. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठी भाषिक म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे, असे डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
हेही वाचा – माजी खासदार निलेश राणेंचा भाजपाला रामराम; शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार
बदलत्या काळानुसार छापील अंकासोबतच ई दिवाळी अंक काढले गेले पाहिजे. डिजिटल आणि ऑडियो बुक्स या साधनांमार्फत आपण वाचकांची व्याप्ती वाढवू शकतो आणि अधिक रंजक पद्धतीने वाचकांसमोर जाऊ शकतो, असे चोरडिया म्हणाले.
एकीकडे मराठी भाषेच्या प्रेमाला उधाण आले असून, दुसरीकडे मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी झगडा सुरू आहे.हा विरोधाभास संपुष्टात येऊन मराठी भाषेच्या प्रेमाला आलेल्या उधाणास विधायक दिशा देत मराठी भाषेचा डंका सर्वदूर पोहोचला पाहिजे, असे डॉ. जोशी म्हणाले. भरत सुरसे, लता पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. बी. आर. माडगूळकर यांनी आभार मानले.





