भडखाऊ भाषण भोवलं; कालीचरण महाराज पुणे पोलिसांकडून जेरबंद
![The inflammatory speech revolved; Kalicharan Maharaj arrested by Pune police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Kalicharan-e1640839805415.jpg)
पुणे | भडकाऊ भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल असलेल्या कालीचरण महाराजांना अखेर पुणे पोलिसांनी अटक केली. खडक पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांनी त्यांना रायपूरमधून ताब्यात घेतलं असून पोलिसांचं पथक पुण्याकडे येत आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानात (दि. 19 डिसेंबर) झालेल्या कार्यक्रमात वादग्रस्त भाषण केले गेले होते. याबाबत पोलीस अंमलदार सोमनाथ ढगे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे. त्यानुसार समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक नागपुरे, अकोल्याचे कालीचरण महाराज, नंदकिशोर एकबोटे आणि दिगेंद्रकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी कलम 295 (अ), 298, 505 (2), 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवप्रतापदिन अर्थात अफझलखान वध दिनानिमित्त समस्त हिंदू आघाडी कडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दोन समाजाच्या भावना दुखतील तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चितावणीखोर भाषणे केली. तसेच धार्मिक श्रद्धाचा अपमान केला आणि येथे जमलेल्या लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कालीचरण महाराज यांचा शोध घेत होते. त्यांना पकडण्यासाठी खडक पोलिसांचे एक पथक दोन दिवसांपूर्वी रायपूरमध्ये गेले होते. त्यानुसार आज कालीचरण महाराज यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान ट्राझिट रिमांड घेऊन पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. काही तासात पथक पुण्यात दाखल होईल, असे सांगण्यात आले आहे.