फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला चौकात फाशी दिली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप

पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून नराधमाने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ७२ तासांच्या कालावधीनंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र या नराधम आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करत कठोर शिक्षा करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या फास्ट ट्रक कोर्टात केस चालवून आरोपीला चौकात फाशी दिली पाहिजे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बसस्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, स्वारगेटची ही जी घटना घडली त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलाय ते खूप दुर्दैवी आहे. आणि मी इथे आल्यावर बघितलं की इथून मुख्य रस्ता तर म्हणजे पन्नास पावलावर पण नाही, पंचवीस पावलावरच आहे. पोलीस स्टेशन पण जवळच आहे. त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात, कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही. त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली, असं सुळे म्हणाल्या.
कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे. मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली. तेव्हाही विनंती केली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हे तेव्हाही होते आणि आजही आहेत. त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्रानी देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे हे माझं मत आहे.
हेही वाचा – शहराच्या तापमानात चढ उताराची शक्यता
या घटनेची माध्यमांना माहिती देताना इथल्या झोनचे चे डिसिपी जे आहेत त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की, या महिलेनं आरडाओरडा केला नाही. त्यांच्याच राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणतात की, तिने आरडाओरडा केला नाही. त्यांच्याकडून चुकीचं वक्तव्य केली जात आहेत. केसला वेगळं वळण देण्याचा प्रयन्त केला जातोय. तिने पैसे घेतलेले होते. या सगळ्या गोष्टींकडं तुम्ही कसं पाहताय? या इतक्या संवेदनशील केसमध्ये पोलिसांनी अशा पद्धतीनं आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे धक्कादायक आहे ह्याचा मी जाहीर निषेध करते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीड जिल्ह्याची बदनामी दोन चार लोकांमुळे होत आहे. राज्यात नव्हे तर देशात बदनामी होत आहे. व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बातम्या मी बघितल्या आहेत, मात्र एक खून माफ आहे असं दिसतंय. माणिकराव कोकाटे आणि मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही तो प्रश्न त्यांच्या पक्षाचा आहे. सुनील केदार यांच्यावर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. मग सुनील केदार यांना एक न्याय आणि माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय कसा? असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.




