‘त्या’ पार्ट टाईम अध्यक्षा; रोहिणी खडसे यांची बोचरी टीका तर चाकणकर म्हणाल्या “दिव्याखाली अंधार असलेल्यांनी…”

मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून, या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाची कार्यपद्धती आणि अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा **रोहिणी खडसे** यांनी या प्रकरणात ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत चाकणकर यांच्यावर गंभीर टीका केली आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पार्ट-टाईम काम करत असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक महिलांवर अत्याचार झाले, मात्र न्याय मिळाला नाही.” त्यांनी हे देखील सांगितले की, वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींवर लावलेली कलमे सौम्य असून, भविष्यात त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, “दिव्याखाली अंधार असलेल्यांनी बोलू नये,” अशा शब्दांत त्यांना टोला लगावला आहे. त्यामुळे दोघींमध्ये शाब्दिक चकमक चांगलीच रंगली आहे. या प्रकरणात वैष्णवीच्या मोठ्या सुनेनेही आपली छळवणूक झाल्याचा आरोप केला असून, महिला आयोगाने तक्रारीची दखल घेतली नाही, असा दावा केला आहे. यामुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
हेही वाचा – UPI मध्ये होणार मोठा बदल; वापरकर्त्यावर नेमका काय होणार परिणाम?
रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, महिला आयोगावर कार्यक्षम आणि संवेदनशील महिला अध्यक्षा नेमण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी म्हटले की, “आपल्या सासऱ्याविरोधात केलेल्या तक्रारीची दखल आयोगाने वेळेवर घेतली असती, तर आज वैष्णवी हगवणे जिवंत असती.”
रोहिणी खडसे यांनी राज्यभर महिलांच्या हक्कासाठी आणि हुंडाबळी विरोधात व्यापक स्तरावर जनजागृती आणि आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. याचबरोबर, आरोपींच्या वकिलांनी बार कौन्सिलमार्फत त्यांचे वकीलपत्र न स्वीकारण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.