महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन

पुणे : फलटण येथील महिला डॉक्टराने मागील आठवडय़ात आत्महत्या केल्याची घटना घडली होती.त्या प्रकरणी एक पोलीस अधिकारी आणि एका घर मालकास अटक करण्यात आली आहे. त्यानंतर महिलांवर होणार्या अन्याय अत्याचारावरून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर टीका करण्यास सुरुवात झाली. त्या सर्व घडामोडी दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटण येथील रुग्णालयास भेट देऊन पोलीस अधिकारी आणि डॉक्टरकडून माहिती घेतली.त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमांशी एकूणच प्रकरणाबाबत माहिती दिली. पण त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचा अवमान केल्याचा आरोप पुण्यातील ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांनी आरोप केला आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुण्यातील धायरी भागातील कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी रुपाली चाकणकर यांच्या समर्थनार्थ आलेल्या महिला आणि ठाकरे गटाच्या महिलांमध्ये शाब्दिक वाद पाहण्यास मिळाला.
हेही वाचा – टॅरिफ तणावादरम्यान भारताचा अमेरिकेसोबत १० वर्षांसाठी संरक्षण करार ; दोन्ही देशांना होणार ‘हे’ फायदे
यावेळी रेखा कोंडे म्हणाल्या,राज्यातील अनेक भागात महिला,तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे.या घटना रोखण्यात हे महायुतीच सरकार अपयशी ठरत आहे.तर अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाच अध्यक्षपद आहे. मात्र त्या आजवर महिलांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्या आहेत.त्याबाबत अनेक उदाहरण आहे.तसेच काही दिवसांपूर्वी फलटण येथील डॉक्टर महिलेने आत्महत्या केली होती.त्या महिलेबाबत रुपाली चाकणकर यांनी वादग्रस्त विधान केले होते.त्या विधानाबाबत रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी आम्ही आंदोलन करीत आहोत,या आंदोलनाची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावी आणि रुपाली चाकणकर याचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला.




