शहरातील दुय्यम निबंधक कार्यालये आज, उद्या बंद

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवार (दि. १९) आणि बुधवारी (दि.20) या दोन दिवशी शहरातील दुय्यम निंबधक कार्यालये बंद राहणार आहेत.मंगळवारी तिसरे (अंतिम) प्रशिक्षण व निवडणूक साहित्य संकलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिनस्त सह दुय्यम निबंधक वर्ग-२ कार्यालये हवेली क्र. १ ते २७ यांची या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केलेली आहे.
त्यामुळे या सर्व कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज मंगळवारी बंद राहणार आहे. मात्र, सह दुय्यम निबंधक हवेली क्र. ६ कार्यालयातील दस्त नोंदणी सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडच्या ‘शाश्वत विकास’साठी एक मत मोलाचे!
तसेच २० नोव्हेंबरला रोजी सार्वत्रिक निवडणुकीमुळे राज्य शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर मतदान संपल्यानंतर मतदान साहित्य जमा करण्यास उशीर होणार आहे.
कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी यांना दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी दि.२१ नोव्हेंबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज सुरू करण्यासाठी साधारणत: २ तास उशीर लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संतोष हिंगाणे यांनी केले आहे.





